माढा - वर्धापन दिन माढा तालुका लेख २०२५
वर्धापन दिन माढा तालुका लेख २०२५
MDH25B04959, MDH25B04957, MDH25B04958
फोटो ओळ - आलेगाव बुद्रूक (ता. माढा ) - येथील राजवी ऍग्रो पॉवर प्रा.लि. साखर कारखाना
फोटो ओळ - भीमा - सीना जोड कालव्याचा बोगदा.
..........
विकासाचा वारसा जपणारा तालुका : माढा
..........
भीमा-सीना जोडकालव्याच्या या बोगद्यामुळे माढा तालुक्यातील २८ गावातील सुमारे आठ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. सीना- माढा उपसा सिंचन योजनेमुळे तालुक्याचे चित्र बदलले. सध्या या योजनेमध्ये आणखीन काही गाव वाढवण्याचे व खैराव-मानेगाव उपसा सिंचन योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दुष्काळी माढा तालुक्याला जिल्ह्यात सर्वाधिक ऊस उत्पादन घेणारा तालुका अशी तालुक्याची ओळख निर्माण झाली आहे. सिंचन क्षेत्रातील प्रगतीमुळे विकासाचा वारसा माढा तालुक्याने जपला आहे.
...........
- किरण चव्हाण, माढा
............
वारसा हा नामाचा, देवा द्यावा आम्हा ।
संपत्ती हा नामाचा, देवा द्यावा आम्हा ॥
वारसा हा भक्तीचा, देवा द्यावा आम्हा ।
वारसा हा सद्गुणांचा, देवा द्यावा आम्हा ॥
वारसा हा संतांचा, देवा द्यावा आम्हा ।
वारसा हा ज्ञानाचा, देवा द्यावा आम्हा ॥
संत तुकाराम महाराज म्हणतात हे देवा, आम्हाला कोणताही भौतिक वारसा नको, फक्त तुझ्या नामाचा वारसा आम्हाला मिळू दे. तुझे नाम हेच आमचे खरे धन-संपत्ती असो. दांभिकपणा नव्हे, तर मनापासूनची निष्ठा. त्याचबरोबर जीवनात सत्य, करुणा, नम्रता, प्रेम अशा सद्गुणांचा वारसा लाभू दे. संतांच्या विचारांचे, त्यांच्या आचरणाचे आणि त्यांच्या शिकवणीचे वारसदार आम्हा होऊ दे. त्यांच्याकडून मिळणारे आत्मिक ज्ञान आमच्या जीवनाला योग्य दिशा देऊ दे. अनेक संतांनी आपल्या अभंगांमध्ये वारसा महत्त्व अधोरेखित केले आहे. वारसा विचारांचा, संपत्तीचा, विकासाचा, राजकारणाचा अशा अनेक प्रकारचा असतो. माढा तालुक्यातील अशा विविध क्षेत्रातील वारसा आपण पाहूया.
माढा तालुक्यातील सिंचन सुविधा, साखर कारखादारीसह राजकारणात निवडणुकीपुरते पक्षभेद असले तरी निवडणुकीनंतर राजकीय लोक एकमेकांना खुल्या मनाने स्वीकारून तालुक्याच्या विकासासाठी एकत्र येण्याचा वारसा जपण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन या सर्वच क्षेत्रांतील तरुणांपुढे आहे.
माढा तालुक्यातील उजनी धरणाच्या उभारणीमुळे केवळ माढा अथवा सोलापूर जिल्हा नव्हे तर राज्यातील पुणे व सातारा जिल्ह्यातील काही भागास सिंचनाचा वारसा या उजनी धरणामुळे मिळाला आहे. माढा तालुक्यातील भीमा- सीना जोडकालव्याचा बोगदा तसेच सीना-माढा उपसा सिंचन योजना या दोन योजनांचा वारसा तालुक्याला मिळाला असून तालुक्याच्या विकासात या योजनांचा सिंहाचा वाटा आहे.
माजी आमदार बबनराव शिंदे यांनी या योजनेच्या कामासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून या योजना चालू केल्या. माढा तालुक्यातील सतत दुष्काळी असणाऱ्या भागातील सुमारे साडेसहा हजार हेक्टरहून अधिक क्षेत्राला पाणी मिळाल्याने तालुक्याच्या अर्थकारणात या योजनेचे मोठे योगदान आहे. सध्या या योजनेमध्ये आणखीन काही गाव वाढवण्याचे व खैराव-मानेगाव उपसा सिंचन योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
भीमा- सीना जोडकालवा हा आशिया खंडातील सर्वात मोठा बोगदा आहे. या बोगद्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या शेती, साखर कारखाने, औद्योगिक क्षेत्राला एक नवी ऊर्जा मिळाली असून जिल्ह्याच्या अर्थकारणात मोठी भर पडली आहे. तालुक्यातील विकासाचा मोठा वारसा या बोगद्याने निर्माण केला आहे. भीमा-सीना जोडकालव्याच्या या बोगद्यामुळे माढा तालुक्यातील २८ गावातील सुमारे आठ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. दुष्काळी माढा तालुक्याला जिल्ह्यात सर्वाधिक ऊस उत्पादन घेणारा तालुका असल्याचा वारसा या दोन योजनांनी दिला आहे.
सिंचनाच्या सुविधा उपलब्ध झाल्याने पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, म्हैसगाव येथील ओंकारेश्वर साखर कारखाना, आलेगाव येथील राजवी ऍग्रो पावर लिमिटेड साखर कारखाना, पडसाळी येथील श्री. संत कुर्मदास सहकारी साखर कारखाना याशिवाय परांडा तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ
शुगर, केवड येथील आमदार बबनरावजी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज, पंढरपुरातील विठ्ठल साखर कारखाना यासह माढा
तालुक्याच्या व आजूबाजूचे अनेक साखर कारखाने या दोन योजनांमुळे हजारो मेट्रिक टन उसाचे गाळप करत आहेत. कारखान्यांमुळे रोजगार निर्मिती, सधन शेतकरी, व्यावसायात वाढ यासारख्या गोष्टी शक्य झाल्या आहेत. तालुक्यातील साखर कारखाने दररोज सुमारे पंचवीस हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करतात. तालुक्यात सुरवातीला माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या प्रयत्नामुळे पिंपळनेर विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, माजी आमदार बबनराव शिंदे व संजय शिंदे यांच्या प्रयत्नातून म्हैसगाव येथील ओंकारेश्वर साखर कारखाना, माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या प्रयत्नातून पडसाळी येथे श्री. संत कुर्मदास सहकारी साखर कारखाना, प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या प्रयत्नामुळे आलेगाव येथील राजवी ऍग्रो साखर कारखाना, माजी आमदार बबनराव शिंदे व माजी सभापती रणजितसिंह शिंदे यांच्या प्रयत्नातून केवड येथे आ. बबनरावजी शिंदे शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजचा साखर कारखान्यांची उभारणी झाली.
सोलापूर जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी माजी आमदार बबनराव शिंदे यांची निवड झाल्यापासून माढा तालुक्यातील दुग्ध व्यवसायाने कात टाकली. तालुक्यातील प्रत्येक गावात किमान एक सहकारी दूध डेअरी स्थापन झाली. शेतकऱ्यांना दुधाचा पूरक व्यवसाय मिळाल्याने दर महिन्याला शेतीच्या खर्चासाठी आर्थिक तरतूद झाली. यामुळे शेतकरी आर्थिकदृष्टया स्वावलंबी बनला असून या दूध संघाला ऊर्जित अवस्थेत आणून धवलक्रांतीचा वारसा पुढे नेण्यासाठी विद्यमान अध्यक्ष रणजितसिंह शिंदे हे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करत आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची शेतकऱ्यांच्या शेतमालाबरोबरच सुशिक्षित बेरोजगार व व्यापाऱ्यांना व्यावसायासाठी कायमस्वरूपी सुविधा म्हणून कुर्डुवाडी, टेंभुर्णी, मोडनिंब, माढा येथील मोक्याच्या ठिकाणी व्यापारी गाळे बांधून सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
माढा तालुक्यातील मोडनिंब व टेंभुर्णी या गावातून गेलेल्या सोलापूर-पुणे एक्स्प्रेस हायवेमुळे तालुक्यातील या दोन्ही गावांचा मोठा विकास झाला आहे. या हायवेमुळे माढा तालुक्यातील अनेक गावातील लोकांना रोजगार यामुळे मिळाला आहे. विशेषतः या हायवेमुळे तालुक्यातील हॅाटेल व्यवसायात मोठी प्रगती झाली आहे.
कुर्डुवाडी जंक्शनमुळे संपूर्ण देशात रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करणे माढा तालुक्यातील प्रवाशांना शक्य झाले आहे. या ठिकाणी असणाऱ्या मालधक्क्यामुळे वाहतूक व्यवसायातही मोठी प्रगती झाली आहे. कुर्डुवाडी रेल्वे डब्याचा कारखाना व व सध्या रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरण्याच्या कामामुळे व्यवसायात वाढ होणार आहे.
माढ्यातील श्री. माढेश्वरी मंदिर, श्री. विठ्ठल मंदिर, अरण येथील श्री. संत सावता माळी मंदिर, म्हैसगावजवळील चिंचगाव टेकडी येथील महादेव मंदिर, रांझणी येथील ओंकारेश्वर मंदिर, लऊळ येथील संत कुर्मदास मंदिर, अंजनगाव खेलोबा येथील श्री. खेलोबा मंदिर, पापनस व उपळाई खुर्द येथील श्री संत बाळूमामा मंदिर यामुळे तालुक्याला एक मोठा देवस्थान व धार्मिक उत्सवाचा वारसा मिळाला आहे.
माढा तालुक्यातील कुर्डुवाडी जनता सहकारी बँक, माढेश्वरी अर्बन को. ऑप. बँक, माढ्यातील सन्मती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, माढ्यातील मनकर्णा पतसंस्था, विठ्ठलवाडीतील श्री. स्वामी समर्थ सहकारी पतसंस्था यासह काही पतसंस्था यांनी माढा तालुक्याच्या अर्थकारणाचा वारसा सक्षमपणे पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू ठेवला.
माढा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात माढ्यातील सहकार महर्षी गणपतराव साठे जिल्हा परिषद प्रशाला, दारफळ येथील नवभारत विद्यालय, कुर्डुवाडी येथील नूतन विद्यालय, आंतरभारती विद्यालय, निमगाव (टे.) येथील श्री. विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमिक शाळा व टेंभुर्णी येथील विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय, माढ्यातील रयत शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय, कुर्डुवाडी के. एन. भिसे कॅालेज, मोडनिंब येथील उमा महाविद्यालय, भारतीय प्रशासकीय सेवेत अनेक अधिकारी देणाऱ्या उपळाई बुद्रूक येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री. नंदिकेश्वर विद्यालय या शिवाय तालुक्यातील विविध संस्थेचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कुर्डुवाडी नगरपालिकेचे भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आर्या पब्लिक स्कूल, तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा त्यामुळे माढा तालुक्याला एक मोठा शैक्षणिक वारसा लाभला आहे.
अरण येथील श्री. संत सावता माळी विद्यालयात खेळा़डूंनी धर्नुविद्यात राष्ट्रीय पातळीवर मजल मारली आहे. माढ्यातील सहकार महर्षी गणपतराव साठे जिल्हा परिषद प्रशालेत खेळाडू खो-खो, कबड्डी, व्हॅालीबॅाल, मैदानी खेळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मजल मारली आहे. याशिवाय उपळाई खुर्द येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील खेळाडूंनी योगासन स्पर्धेत राज्यस्तरापर्यंत मजल मारली आहे तर सापटणे भोसे येथील कुस्ती सम्राट अस्लम काझी , वडशिंगे येथील जाधव बंधू, काजल जाधव यांनी कुस्ती क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. क्रीडा क्षेत्रातील माढा तालुक्याचा हा वारसा अनेक खेळाडू मोठ्या नेटाने पुढे नेत आहेत.
माढा तालुक्यात गाव तेथे ग्रंथालय ही चळवळ राबविण्यात आली. माढ्यातील शिवलाल रामचंद्र वाचनालय, विठ्ठलवाडीतील श्री. विठ्ठल सार्वजनिक वाचनालय, अरण येथील हरिभाऊ शिंदे वाचनालय यासह तालुक्यातील अनेक गावातील वाचनालयाच्या तालुक्यातील वाचन संस्कृती वृद्धिंगत करत असून माढा तालुक्यातील ग्रंथालय चळवळीचा हा वारसा पुढे नेण्याचे आव्हान या क्षेत्रातील मंडळी समोर आहे.
माजी आमदार (कै.) काशिनाथ अस्वरे, माजी आमदार (कै.) कृष्णराव परबत, माजी आमदार भाई एस. एम. पाटील, माजी आमदार (कै.) विठ्ठलराव शिंदे यांनी दिलेला विकासाचा, विचारांचा, राजकारणाचा वारसा माजी आमदार धनाजीराव साठे, माजी आमदार विनायकराव पाटील, माजी आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार संजय शिंदे, माजी मंत्री प्रा. तानाजीराव सावंत, आमदार अभिजित पाटील, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांच्यासह तालुक्यातील अनेक नेते मंडळी पुढे नेत आहेत.
निमगाव (टे.) येथील माजी आमदार (कै.) विठ्ठलराव शिंदे यांनी माढा तालुक्यात सर्वप्रथम साखर कारखाना उभारणीचा प्रयत्न केला व त्याला त्यांचे पुत्र माजी आमदार बबनराव शिंदे यांनी त्याला मूर्तरूप देवून साखर कारखाने काढले. त्यांच्या विठ्ठलराव शिंदे कारखान्याचा लैाकिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला. सोलापूर जिल्ह्यातील पहिले सहकारमहर्षी गणपतराव साठे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेची दारे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी खुली करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे.
माढा तालुक्याचे विद्यमान आमदार अभिजित पाटील यांनी माढा तालुक्यातील अनेक प्रश्न विधानसभेच्या अधिवेशनात मांडून हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले असून यामुळे माढा तालुक्यातील व माढा विधानसभा मतदारसंघातील अनेक समस्या महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. हे सर्व प्रश्न विधानसभेच्या अधिवेशनात मांडल्यामुळे या प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी मदत होणार आहे. कृषी महोत्सव व मनोरंजनाचे विविध कार्यक्रम आमदार अभिजित पाटील यांनी सुरू केल्याने याचा या भागातील लोकांना उपयोग होत आहे.
-- चौकट --
शिक्षण, सहकार अन् उद्योगात अग्रेसर
उजनी धरण, भीमा-सीना जोडकालवा, सीना- माढा उपसा सिंचन योजना, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, ओंकारेश्वर साखर कारखाना, सूत गिरणी, राजवी ॲग्रो साखर कारखाना, संत कुर्मदास साखर कारखाना, आमदार बबनरावजी शिंदे शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज, टेंभूर्णीमधील औद्योगिक वसाहत, टेंभुर्णी-मोडनिंब येथून जाणारा सोलापूर - पुणे एक्स्प्रेस वे, कुर्डुवाडी जंक्शन, कृषी उत्पन्न बाजार समिती, संत सावता माळी मंदिर अरण, माढ्यातील श्री. विठ्ठल मंदिर व श्री. माढेश्वरी मंदिर, माढ्यातील कला व वाणिज्य महाविद्यालय, कुर्डुवाडीतील नूतन व आंतरभारती विद्यालय, दारफळमधील नवभारत विद्यालय, मोडनिंब येथील उमा महाविद्यालय, कुर्डुवाडीतील के. एन. भिसे कॅालेज, आय.टी.आय., कला विद्यालय, टेंभुर्णी येथील विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय, माढ्यातील शिवलाल रामचंद्र वाचनालय, कुर्डुवाडी जनता बँक, माढेश्वरी बँक, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध शाखा, माढ्यातील मनकर्णा व सन्मती पतसंस्थेसह तालुक्यातील विविध पतसंस्था, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या तालुक्यातील विविध सहकारी संस्था, पुण्याच्या सर्व भागात शैक्षणिक संकुले असलेले जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ व तालुक्यातील आजी माजी आमदारांमुळे तालुक्याला विकास, सिंचन, राजकारणासह विविध क्षेत्रातील वारसा प्राप्त झाला असून तो जपण्याची आवश्यकता व जबाबदारी आता पुढील पिढीवर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

