माढा परिसरात युरोपियन बदकांचा मुक्काम!
MDH25B04973, MDH25B04974
माढा ः येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील तलावात दाखल झालेले युरोपियन बदक (छायाचित्र ः प्रा. मयूर चव्हाण)
माढा परिसरात युरोपियन बदकांचा मुक्काम
विविध तलावांत मुक्त विहार सुरू; हजारो किलोमीटरवरून स्थलांतर
माढा, ता. २८ : सध्या माढा परिसरात विविध प्रजातींचे स्थलांतरित पक्षी डेरेदाखल झाले असून येथील रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या खासगी शेततळ्यात, माढा-शेटफळ रस्त्यालगतच्या गालिशाबाबा तळ्यामध्ये व माढेश्वरी मंदिरालगतच्या मनकर्णा नदीमध्ये युरोपियन बदक मोठ्या प्रमाणात विहार करताना दिसून येत आहेत.
थंडीच्या दिवसात पृथ्वीच्या विविध भूखंडांतून बदलत्या हवामानानुसार अनेक जीव स्थलांतर करतात. यामध्ये सर्वांत लांब पल्ल्याचे स्थलांतर पक्षीच करतात. युरोप खंडातील अनेक देशांना ओलांडून हजारो मैलांचा प्रवास करत, हिंदुकुश पर्वत पार करून व सिंधू नदीचे खोरे ओलांडून भारतात येणाऱ्या या बदकांना टफ्टेड पोचर्ड तर मराठीमध्ये शेंडीबदक म्हणतात. महाराष्ट्रीयन आदिवासी भाषांमध्ये या बदकांना ''बाड्डा'' म्हटले जाते. या पक्षांचा रहिवास मुख्यतः पाणथळ प्रदेशाभोवती असतो. युरोप खंडात हिवाळ्यात जेव्हा हिमवर्षा सुरू होते व पाणथळ प्रदेश गोठून असह्य थंडी सुरू होते, तेव्हा हे पक्षी थंडीचा कमी दाब असलेल्या दक्षिणी व पौर्वात्य जगताकडे अन्नाच्या शोधात पाणथळ प्रदेशांनी स्थलांतर करतात. भारतात या पक्षांचे आगमन नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला होऊ लागते. एप्रिल महिन्यापर्यंत पक्षी इथेच राहतात. उन्हाळा सुरू होताच ते पुढे मार्गक्रमण करतात. या पक्षांचे मुख्य खाद्य पाणथळ भूभागातील शेवाळ, जलीय किटक व मासे हे असून ते केवळ पाणथळ भागातच मुक्काम करतात. या बदकांतील नराच्या डोक्यावर बाकदार तुरा असतो, चोच चमकदार असून डोके व पंख गडद काळे असतात व पोटाचा भाग शुभ्र पांढरा असतो, डोळे गडद पिवळे असतात. मादी तपकिरी चमकदार रंगाची असते. हे बदक एकत्रित समूहाने प्रवास करतात व खाद्याच्या शोधात देशोदेशी स्थलांतर करतात.
माढा परिसर अनुकुल
सध्या माढा शहरात व परिसरात या पक्षांनी मुक्काम केला असून येथील रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या खासगी शेततळ्यात हे परदेशी पाहुणे मोठ्या संख्येने विहार करताना दिसून आले. युरोप खंडातून येणाऱ्या या परदेशी पक्षांसाठी माढा परिसर अनुकूल असल्याचे त्यांच्या आगमनातून अधोरेखित होत असून जैवविविधतेच्या दृष्टीने हा परिसर पोषक असल्याचे ठळक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

