शिवसेनेच्या मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराला प्रतिसाद
दहिवडीत उपचार शिबिराला प्रतिसाद
दहिवडी, ता. २९ : शिवसेना माण तालुका, धर्मवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, धर्मवीर कुस्ती संकुल दहिवडी आणि मिरज येथील सिनर्जी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराला रुग्णांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबिरास शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव व सहकाऱ्यांनी भेट दिली.
या शिबिरात १५० हून नागरिकांची ईसीजी तपासणी, डोळ्यांची तपासणी, हृदयरोग तपासणी, कान-नाक-घसा विकार, दंतचिकित्सा, तसेच हाडांचे आजार यांची मोफत तपासणी करण्यात आली. कान, नाक, घसा यांचे ऐंशी रुग्ण, डोळ्यांचे दहा, हाडांचे चाळीस रुग्ण तपासण्यात आले. तीस गरजू रुग्णांवर शासकीय नियमांनुसार मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती शिबिराचे संयोजक व शिवसेना तालुकाप्रमुख समीर जाधव यांनी दिली. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी ही सुविधा मोठा दिलासा ठरणार आहे.
या शिबिराचे आयोजन मिरज येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिबिरात पोटविकार तज्ज्ञ डॉ. मेजर विशाल पाटील, डॉ. सचिन वनमोरे, डॉ. रोहन अकिवटे, नेत्रतज्ज्ञ डॉ. ऋषिकेश आरळी, कॅम्प को ऑर्डिनेटर नंदकुमार सुतार, डॉ. रुपडीकर, तसेच सिनर्जी हॉस्पिटलच्या अन्य सहकाऱ्यांनी रुग्णांची तपासणी केली.
.......................................
दहिवडी : सर्वरोग निदान व उपचार शिबिरात रुग्ण, तसेच डॉक्टरांशी संवाद साधताना चंद्रकांत जाधव व मान्यवर. (रूपेश कदम : सकाळ छायाचित्रसेवा)

