(पान ४ ला ॲंकर)
MSI26B09181
साक्री : सी. गो. पाटील महाविद्यालयात ‘करिअर कट्टा- करिअर संसद’ शपथविधीप्रसंगी उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापक.
---------------
राष्ट्रनिर्मितीत विद्यार्थ्यांनी सक्रिय व्हावे : डॉ. राजेंद्र अहिरे
म्हसदी महाविद्यालयात ‘करिअर कट्टा- करिअर संसद’ शपथविधी उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
म्हसदी, ता. १५ : सातत्य, वेळेचे योग्य नियोजन, शिस्त आणि अविरत परिश्रम यांच्या बळावरच जीवनात यश संपादन करता येते. महाविद्यालयीन युवकांनी केवळ पदवी मिळविण्यावर समाधान न मानता कौशल्याधारित शिक्षण, सकारात्मक दृष्टिकोन आणि सामाजिक बांधिलकी जोपासून राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करिअर कट्टा धुळे जिल्हा ग्रामीणचे प्राचार्य प्रवर्तक तथा विद्या विकास मंडळाच्या सीताराम गोविंद पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे यांनी केले.
मुंबई येथील उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र आणि सीताराम गोविंद पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित ‘करिअर कट्टा- करिअर संसद’ शपथविधी सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अनंत पाटील होते. या वेळी आयक्यूएसी समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, करिअर कट्टा समन्वयक डॉ. धनंजय पाटील आणि डॉ. अनुप मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. अहिरे म्हणाले, आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक गुणवत्ता पुरेशी नसून विविध कौशल्ये आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधींचा योग्य लाभ घेत स्वतःची क्षमता विकसित करावी. समाज, कुटुंब आणि राष्ट्राप्रती असलेल्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवून प्रामाणिकपणे कार्य करणारा युवकच देशाच्या प्रगतीचा खरा शिल्पकार ठरतो. स्पष्ट ध्येय, वेळेचे व्यवस्थापन, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर यशस्वी वाटचाल शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अनंत पाटील यांनी करिअर कट्टा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, स्वयंप्रेरणा, निर्णयक्षमता आणि सामाजिक उत्तरदायित्व विकसित होत असल्याचे सांगितले. करिअर संसदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लोकशाही मूल्यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळत असून, कृतिशील नेतृत्व घडविण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
करिअर कट्टा समन्वयक डॉ. धनंजय पाटील यांनी उपक्रमाची उद्दिष्टे, विविध उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातील त्याचे महत्त्व अधोरेखित केले. सूत्रसंचालन डॉ. अनुप मोरे यांनी, तर आभार डॉ. भूषण अहिरराव यांनी मानले.
यावेळी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या करिअर संसदेच्या विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा उत्साहात पार पडला. यामध्ये विशाखा भामरे यांनी मुख्यमंत्री, उर्मिला पवार यांनी नियोजन मंत्री, रितुजा कापडे यांनी कायदे व शिस्तपालन मंत्री, नेहा सोनवणे यांनी सामान्य प्रशासन मंत्री, कल्याणी खैरनार यांनी माहिती व प्रसारण मंत्री, नकुल साळुंके यांनी उद्योजकता विकास मंत्री, महेंद्र आहेर यांनी रोजगार व स्वयंरोजगार मंत्री, भाविका जाधव यांनी कौशल्य विकास मंत्री, भाविका पाटील यांनी संसदीय कामकाज मंत्री, माधुरी पाटील यांनी महिला व बालकल्याण मंत्री, तर चेतन मोहिते यांनी सदस्य म्हणून शपथ घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. चंद्रकांत कढरे, प्रा. भटू पाटील, गौतम बच्छाव आणि अतुल ठाकरे यांनी विशेष परिश्रम घेतले.