मसूर : संपूर्ण तालुक्यातील शेतीला दिवसा वीज... मग मसूर भागावरच अन्याय का?...

मसूर : संपूर्ण तालुक्यातील शेतीला दिवसा वीज...  मग मसूर भागावरच अन्याय का?...
Published on

शेतीपंपांना दिवसा विजेची मागणी

मसूरसह हेळगावमधील शेतकरी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

मसूर, ता. १० : कऱ्हाड तालुक्यातील अनेक भागांत शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा दिला असताना मसूरसह हेळगाव परिसरातील शेतकऱ्यांना रात्रीचा वीज पुरवठा का? असा संतप्त सवाल येथील शेतकऱ्यांनी केला आहे. शेतीपंपांना दिवसा वीज मिळावी, यासाठी अन्याय आंदोलनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.
सध्या उन्हाच्या तीव्र झळा, पाण्याची टंचाई आणि पिके करपण्याचे संकट अशा दुहेरी-तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. अशातच रात्रीच्या वेळेत शेतीसाठी वीजपुरवठा दिला जात असल्याने शेतकऱ्यांच्या जीवितालाच धोका निर्माण झाला आहे.
मसूरसह हेळगाव परिसरात बिबट्या, रानडुक्कर, गवे तसेच इतर हिंस्त्र प्राण्यांचा वावर वाढला आहे. याशिवाय सर्पदंशाच्या घटनाही वारंवार घडत असून, संबंधित यंत्रणांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
दिवसा वीज दिल्यास सुरक्षितपणे शेतीची कामे करू शकतो; पण रात्रीची वीज म्हणजे आमच्या जिवाशी खेळ आहे, अशी प्रतिक्रिया येथील शेतकऱ्यांमधून उमटत आहेत. कऱ्हाड तालुक्यात इतर भागांना दिवसा वीज दिली जात असताना केवळ मसूर आणि हेळगाव परिसरातील शेतकऱ्यांवरच अन्याय का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, वाढत्या रोषामुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ आता एकवटू लागले असून, दिवसा वीजपुरवठ्याबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास महावितरण कार्यालयावर मोर्चा, रास्तारोको आणि तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांचा अंत पाहू नका; दिवसा वीज द्या, अन्यथा संघर्ष अटळ आहे,असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.
---------------------------
शहापूरच्या घटनेने भीती

गेल्या पंधरा दिवसांपूर्वी मसूर परिसरातील शहापूर येथील तीन जणांवर बिबट्याने हल्ला केला होता. त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी परिसरात बिबट्याचा वावर आहे, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री पिकांना पाणी देण्यासाठी जाणे अवघड झाले आहे. शहापूर येथील घटनेने शेतकऱ्यांमध्ये भीती वाढली आहे.
----------------------------
लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे

या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. केवळ आश्वासने न देता प्रत्यक्षात दिवसा वीजपुरवठ्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा शेतकऱ्यांचा संताप वाढून तीव्र आंदोलन होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
-------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com