
मुंबईचा सलग पाचवा विजय
मुंबई, ता. १४ ः हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने मंगळवारी महिला प्रीमियर लीगमध्ये सलग पाचव्या विजयाला गवसणी घातली. मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्स संघावर ५५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. हरमनप्रीत कौरची अर्धशतकी खेळी, नॅट सिव्हरची अष्टपैलू चमक आणि हेली मॅथ्यूज, अमेलिया केर यांची प्रभावी गोलंदाजी या विजयाचे वैशिष्ट्य ठरली.
मुंबईकडून मिळालेल्या १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या गुजरातला ९ बाद १०७ धावांपर्यंतच मजल मारता आली. हर्लीन देओलने २२ धावांची, स्नेह राणाने २० धावांची आणि सुषमा वर्माने नाबाद १८ धावांची खेळी केली. हेली मॅथ्यूजने २३ धावा देत ३, तर अमेलिया केर हिने १८ धावा देत २ फलंदाज बाद केले.
दरम्यान, याआधी प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने २० षटकांत ८ बाद १६२ धावा फटकावल्या. ॲश्ले गार्डनर हिने हेली मॅथ्यूज हिला शून्यावर बाद करून गुजरात संघासाठी छान सुरुवात करून दिली. पण त्यानंतर यास्तिका भाटिया व नॅट सिव्हर ब्रंट या जोडीने ७४ धावांची भागीदारी करताना गुजरातच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. किम गार्थ हिने सिव्हरला ३६ धावांवर बाद करीत मोठा अडसर दूर केला. त्यानंतर ९ धावांच्या अंतरात यास्तिकाही ४४ धावांवर धावचीत बाद झाली.
कर्णधार हरमनप्रीत कौर हिने स्वबळावर मुंबईची धावसंख्या पुढे नेली. तिने ३० चेंडूंमध्ये ७ चौकार व २ षटकारांसह ५१ धावांची मौल्यवान खेळी साकारली. अमेलिया केर हिने १९ धावा केल्या. मुंबईच्या इतर फलंदाजांना ठसा उमटवता आला नाही. गार्डनर हिने ३४ धावा देत ३ फलंदाज बाद केले.
संक्षिप्त धावफलक ः मुंबई इंडियन्स २० षटकांत ८ बाद १६२ धावा (यास्तिका भाटिया ४४, नॅट सिव्हर ३६, हरमनप्रीत कौर ५१, ॲश्ले गार्डनर ३/३४) विजयी वि. गुजरात जायंट्स २० षटकांत ९ बाद १०७ धावा (हर्लीन देओल २२, हेली मॅथ्यूज ३/२३).