

उल्हासनगरमध्ये युतीला तडा भाजपची बाहेर पडण्याची घोषणा उल्हासनगर, ता. ३ (वार्ताहर) : स्वीकृत नगरसेवकांच्या सात जागांच्या निवडीवरून भाजप आणि शिवसेनेतील वाद चिघळला आहे. शिवसेनेला पाच, तर भाजपला दोन जागा मिळाल्यानंतर भाजपने शनिवारी सत्ताधारी युतीतून बाहेर पडण्याची घोषणा केली. यापुढे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना कोणत्याही निवडणुकीत सहकार्य न करण्याची भूमिकाही भाजपने जाहीर केली. स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून उल्हासनगर महापालिकेतील भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष चिघळला असून, भाजपने सत्ताधारी युतीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. आमदार कुमार आयलानी, जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया आणि माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी पत्रकार परिषद घेत निवड प्रक्रियेवर आक्षेप घेतला. या वेळी भाजपचे नगरसेवक, मंडळ अध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पत्रकार परिषदेत महापौर अश्विनी निकम यांचे पती कमलेश निकम यांच्यावरही टीका करण्यात आली. .... शिवसेनेला मित्र मानायचे की शत्रू : प्रदीप रामचंदानी भाजपच्या चारपैकी दोन उमेदवारांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे बाद झाल्यानंतर पर्यायी उमेदवारांच्या निवडीवरूनही वाद झाला. अखेरीस शिवसेनेचे पाच आणि भाजपचे दोन सदस्य निवडले गेले. या प्रक्रियेविरोधात न्यायालयात जाण्याची भूमिका भाजपने यापूर्वीच मांडली आहे. शिवसेनेला मित्र मानायचे की शत्रू, हेच समजेनासे झाल्याची टीका प्रदीप रामचंदानी यांनी केली. गेल्या सात महिन्यांतील घटनांमुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढला असून, अशा परिस्थितीत युतीसोबत वाटचाल करणे कठीण झाल्याचे त्यांनी सांगितले. निविदा, जमीन व्यवहार आणि शहरातील कथित अवैध व्यवसायांबाबतही त्यांनी आरोप केले. भाजप कार्यकर्ते या मुद्द्यांवर शांत बसणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. .... विरोधी पक्षाची भूमिका बाजावणार : आमदार कुमार आयलानी आमदार कुमार आयलानी यांनी भाजपने आतापर्यंत युती धर्म पाळल्याचे सांगत महापौर आणि शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. तसेच यापुढे आम्ही सत्तेतून बाहेर पडत असून, विरोधी पक्षाची भूमिका बजावणार असल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले. खासदार शिंदे यांनी भाजप कार्यकर्त्यांनाही आपले समजावे, असे आवाहन त्यांनी केले. स्वीकृत सदस्यांची निवड एका महिन्यात अपेक्षित असताना प्रक्रिया सात महिने लांबली आणि महापौरपदाचा गैरवापर झाला, असा आरोप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी केला. संपूर्ण घटनाक्रम वरिष्ठ नेत्यांच्या निदर्शनास आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.