शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या
शोधासाठी विशेष मोहीम
सकाळ वृत्तसेवा
नामपूर, ता. १५ : जिल्ह्यात शिक्षकांची हजारो पदे रिक्त असताना आणि अनेक शिक्षक इतर शासकीय कामांत गुंतलेले असतानाच शिक्षण विभागाने १५ ते ३० जुलैदरम्यान शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोधासाठी विशेष सर्वेक्षण मोहीम जाहीर केली आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम-२००९ अंतर्गत ६ ते १४ वयोगटातील शिक्षणापासून वंचित, अनियमित उपस्थिती असलेली तसेच स्थलांतरित मुले शोधून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
गावे, झोपडपट्ट्या, वीटभट्ट्या, बांधकामस्थळे, उसतोड कामगारांच्या वसाहती, रेल्वे-बसस्थानके आदी ठिकाणी प्रत्यक्ष सर्वेक्षण केले जाणार आहे. महसूल, ग्रामविकास, महिला व बालविकास, आरोग्य आणि शिक्षण विभागाच्या समन्वयातून ही मोहीम राबविण्यात येणार असून आढळलेल्या प्रत्येक शाळाबाह्य बालकाला तातडीने शाळेत दाखल करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
पालकांची नाराजी
दरम्यान, यामुळे पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून या कामासाठी स्वतंत्र यंत्रणा नियुक्त करावी, अशी मागणी पालक संघाने केली आहे.