नागठाणे क्रीडा पानासाठी
राज्यपातळीवर चार शिक्षकांची निवड
योगासन स्पर्धा; नंदकुमार गुळीक, ज्ञानेश्वर जाधव, निवृत्ती सलगरे, सीमा डेरेंचे यश
नागठाणे, ता. २९ : शिक्षक, कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी आयोजिलेल्या क्रीडा स्पर्धेतील योगासन विभागात जिल्ह्यातील चार शिक्षकांची राज्यपातळीवर निवड झाली आहे. जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी हे अभिमानास्पद यश मानले जात आहे.
सध्या राज्यात सर्वत्र शिक्षक, कर्मचारी अन् अधिकाऱ्यांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा सुरू आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे यंदा प्रथमच हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यात योगासन स्पर्धेत नंदकुमार गुळीक, ज्ञानेश्वर जाधव, निवृत्ती सलगरे, सीमा डेरे या जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी नेत्रदीपक यश कमाविले आहे. त्यांची कोल्हापूर येथे नुकत्याच आयोजिलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेतून राज्यपातळीवर निवड झाली आहे.
नंदकुमार कोंडीबा गुळीक हे क्रीडा शिक्षक आहेत. ते सध्या माण तालुक्यातील वडजल येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयात कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांत खेळाची आवड निर्माण करण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजाविली आहे. ते उत्तम क्रीडापटू आहेत.
ज्ञानेश्वर दिनकर जाधव हे वाई तालुक्यातील विठ्ठलवाडी (चिखली) येथील प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. निष्णात जलतरणपटू म्हणूनही ते ओळखले जातात. कराटे, जिम्नॅस्टिकमध्येही त्यांनी प्रावीण्य मिळविले आहे.
निवृत्ती गुंडू सलगरे हे कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे खुर्द येथील प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. तालुका क्रीडा समन्वयक म्हणूनही त्यांनी भरीव कामगिरी बजाविली आहे. प्राथमिक शिक्षकांच्या क्रीडा संघटनेच्या माध्यमातूनही ते सातत्याने सक्रिय असतात.
सीमा डेरे या वाई तालुक्यातील कवठे येथील प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. विभागीय स्पर्धेत त्यांनी ऐच्छिक योगासन प्रकारातील शीर्ष पद्मासन अन् बुद्धकोनासन अशा अवघड योगासन प्रात्यक्षिकाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
यशस्वी खेळाडूंचे जिल्हा परिषदेच्या ''सीईओ'' याशनी नागराजन, शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, ''डाएट''चे प्राचार्य डॉ. जितेंद्र साळुंखे, डॉ. अमोल डोंबाळे आदींनी अभिनंदन केले.
...........................................................
सकाळ समूहाचे सदस्य
ज्ञानेश्वर जाधव दै. ‘सकाळ’च्या उपक्रमशील शिक्षक समूहाचे सदस्य आहेत. याच समूहाच्या प्रांजली नलवडे- जगताप, राणी दत्तात्रय कोरडे यांची याआधी शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत राज्यपातळीवर निवड झाली आहे.
फोटो :..........08001
........................................................

