वर्धापनदिन लेख नंबर ३
टीप- पांडुरंगाचा व आषाढी वारीतील रिंगणे सोहळ्यातील संग्रहित फोटो वापरणे.
..............
समतेचा ध्वज उंचवणारे वारकरी संप्रदयाचा वारसा
..............
अनेक वारकरी साहित्यिकांना आणि संतांना पंढरपूराने वैचारिक तत्वज्ञान पुरविले. साधारणपणे इसवी सनाच्या दहाव्या शतकापासून वारकरी संप्रदाय विकसित व्हायला सुरूवात झाली. भक्त पुंडलिकाने आपल्या भक्तीने विष्णूला पंढरपूरला आणले. त्यांच्यामुळेच तो वीटेवर उभा राहिला आणि विठ्ठल या नावाने अवघ्या राष्ट्रातील अध्यात्मिक विचाराला व्यापून राहिला. प्राचीन वैदिक विचार आणि संस्कृतीत वारकरी संप्रदायाने कालानुरूप बदल स्वीकारले. वारकरी संप्रदयाने मानवतेची ध्वजा उंच धरत समतेचा वारसा जपला.
....
विवेक राऊत
....
ज्ञान विचार आणि समतेची परंपरा... पंढरपूर हे महाराष्ट्राचे आणि मराठी माणसांचे आराध्य दैवत. ही परंपरा हजारो वर्षे मोठ्या भक्ती भावामध्ये सुरू आहे. पंढरपूर ही अध्यात्मिक नगरी. प्राचीन शैवपीठ. पुढे शैव आणि वैष्णव यांचा समन्वय. वीटेवरच्या पांडुरंगाच्या रूपाने अवघ्या देशाला प्रेरणा स्त्रोत बनून राहिला. बहिणाबाईंच्या शब्दात सांगायचे झाले तर-
‘संतकृपा झाली । इमारत फळा आली।।
ज्ञानदेवे रचिला पाया । उभारिले देवालया।।
नामा तयाचा कंकर । तेणे केला हा विस्तार।।
जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ।।
तुका झालासे कळस । भजन करा सावकाश।।’
गौतम बुद्ध, भगवान महावीर, नाथ संप्रदाय याच्यातील वैचारिक स्वातंत्र्य वारकरी संप्रदायाने स्वीकारले. मनुष्याला विकासापासून वंचित ठेवणाऱ्या बंदिस्त चौकटी वारकरी संप्रदायाने मोडून टाकल्या. ‘विष्णूमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम, अमंगळ।’ हा वैचारिक संदेश या संप्रदायाने दिला. प्रत्येकाला स्वतःचा उद्धार करण्याचा अधिकार आहे आणि साध्या सोप्या रितीने तो करता येतो. ‘आधी संसार करावा नेटका’ या उक्तीप्रमाणे जीवन मोक्षासाठी जंगलात जाण्याची आवश्यकता नाही. तपःश्चर्या करण्याची आवश्यकता नाही. देहदंडन करण्याची आवश्यकता नाही. योग्य आहार, योग्य विहार आणि नामचिंतनाच्याद्वारे तुम्ही अध्यात्मातले सर्वोच्च पद मिळवू शकता.
संत नामदेव व ज्ञानदेव यांच्या कालखंडात वारकरी संप्रदायाचा पाया भक्कम झाला. कोणताही संप्रदाय विकसित व्हायचा असेल तर त्याला दोन गोष्टींची आवश्यकता असते. एक दैवत आणि दुसरा धर्म ग्रंथ. सगळ्या बहुजन समाजाला एकत्र करणारा पंढरपूरचा पांडुरंग दैवत म्हणून या संप्रदायाला मिळाला आणि त्याचबरोबर ‘ओम नमोजी आद्या’ या वचनाने सुरूवात होणारा आणि ‘आता विश्वात्मके देवे’ असा पसायदान मागणारा, सगळ्या जगाच्या कल्याणाची चिंता वाहणारा ज्ञानेश्वरी सारखा अप्रतिम ग्रंथ या संप्रदायाला विचार ग्रंथ, धर्म ग्रंथ म्हणून मिळाला.
तसा विचार केला तर आपल्या लक्षात येते की, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या घराण्यात पंढरीची वारी होती. नामदेवांचेही पूर्वज पंढरपूरातच राहत असल्याने पांडुरंगावर भक्ती करणारे होते. संत तुकाराम महाराजांच्या घराण्यातही म्हणजेच विश्वंभर बाबापासून पंढरीची वारी होती. त्यांच्या पूर्वजांनी देहू गावात पांडुरंगाचे मंदिर बांधल्याचे आपल्या लक्षात येते. या संप्रदायाचे वैशिष्ठ्य असे की, हे सर्वजण पंढरपूरात पांडुरंगाच्या दर्शनासाठी येत असत. याच क्रियेला वारी असा शब्द प्रचलित झाला. गळ्यात तुळशीमाळा घालणे आणि पंढरपूरची वारी करणे या दोन गोष्टी महत्त्वाच्या झाल्या. संप्रदायातील प्रवेश तुळशीच्या माळेवरून निश्चित होत असे. संप्रदायाच्याच एखाद्या अधिकारी व ज्ञानी व्यक्तीकडून ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’चा गजर करत माळ घालण्याचा विधी व्हायचा आणि जीवन भवसागर तरून जाण्यासाठी सत्य, सुंदर, मंगल प्रत्यक्ष आयुष्यात आचरणात आणून स्वतःचा उद्धार करून घ्यावा ही संकल्पना यापाठीमागे होती.
पंढरपूरची नित्यनियमाने वारी करणारा म्हणजेच वारकरी. वारकरी हा शब्द सुद्धा वारीवरून आलेला आपणाला दिसून येतो. आणखी एखादा प्रतिकात्मक अर्थ काढायचा झाल्यास, जे जे समाजहिताच्या विरोधात आहे, अनिष्ठ आहे, सामाजिक समतेला विरोध करणारे आहे, त्याच्यावर वार करणारा म्हणजे वारकरी. वारकऱ्यांच्या साहित्याने क्रांती केली. संत नामदेव व त्यांचा सर्व परिवार, संत ज्ञानदेव व त्यांचा परिवार, संत चोखामेळा व त्यांचा परिवार या प्रत्येकाने मराठी साहित्यामध्ये अनमोल अशा विचारांची भर घातली. संत नामदेव महाराजांच्या घरातील त्यांचे आई-वडील, त्यांची मुले नारा, विठा, गोंदा, महादा या सर्वांचे अभंग आपणाला दिसून येतात. तसेच, त्यांच्या घरात असणारी दासी जनाबाईने सुद्धा सुंदर सुंदर अभंग लिहिले.
‘नामदेवाचे घरीं । चौदाजण स्मरती हरी ॥१॥
चौघेपुत्र चौघी सुना । नित्य स्मरती नारायणा ॥२॥
आणिक मायबाप पाही । नामदेव राजाबाई ॥३॥
आऊबाई लेकी निंबाबाई बहिणी । पंधरावी ती दासी जनी ॥४॥’
संत ज्ञानेश्वरांचे वडील बंधू संत निवृत्तीनाथ, धाकटे बंधू संत सोपानदेव, बहिण मुक्ताबाई या सर्वांचे साहित्य अतिशय सुंदर आहे. मंगळवेढ्यामध्ये भगवद् भक्ती करणारे संत चोखामेळा, संत बंकामेळा, संत कर्ममेळा, संत भागुबाई, संत निर्मळाबाई या सर्वांचे अभंग मराठी साहित्याची वैचारिक उंची वाढवत असलेले आपणास आढळून येतात. आषाढी वारीच्या निमित्ताने हे सर्व संत पंढरपूरला एकत्र येत. चंद्रभागेत स्नान, पांडुरंगाचे दर्शन झाल्यानंतर चंद्रभागेच्याच वाळवंटात विचार मंथनाची एक परिषद भरत असे. यालाच संतमेळा असे म्हणत. या संतमेळ्याचा शेवट संत नामदेवांच्या कीर्तनाने होत असे. चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तन करणाऱ्या नामदेवांचे अतिशय सुंदर वर्णन जनाबाईने केले आहे. प्राचीन काळात नारदाने सुरू केलेली कीर्तन परंपरा संत नामदेवांनी नवीन रूपामध्ये विकसित केली आणि वारकरी संप्रदायाला समाजप्रबोधनासाठी कीर्तन संस्था नावाची लोकसाहित्य परंपरेत मानाचे स्थान असणारी प्रबोधन कला मिळाली आणि याच कीर्तनाच्या माध्यमातून गावोगावी नवीन विचार लोकमानसात रूजवला जाऊ लागला. हे सर्व संत लोकांना एकत्र करून पंढरपूरला येत. त्यांच्यानंतर हीच परंपरा सुरू राहिली. विशेषतः वारकरी संप्रदायातील आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशी अतिशय पवित्र मानल्या जातात. यासाठी संतभार पंढरीच्या दिशेने येत असतो. पुढे ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीनंतर आळंदी येथून आषाढी एकादशीच्या निमित्ताने पालखी पंढरपूरच्या दिशेने यायला सुरूवात झाली. रथात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका आणि भावार्थ दीपिका ठेवून लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने येत असतात. आपल्या लक्षात येईल, ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी पंढरपूरची वारी करीत असत. पुढे ज्ञानेश्वर महाराज स्वतः पंढरपूरच्या वारीला येत असत. नंतर तुकाराम महाराजांचे पुत्र, नारायण महाराज यांनी सोहळ्याला चालना दिली. ते देहूहून तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन, आळंदीला येत असत व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घेऊन पंढरपूरला येत. श्री हैबतबाबा व शितोळे सरकार हे दोघेजण ग्वाल्हेरकर शिंदे यांचे सरदार होते. हैबतबाबा सातारा जिल्ह्यातील अरफळचे. पवार घराणे हे पराक्रमी घराणे म्हणून ख्यात होते. वारीत शिस्त यावी असे दोघांनाही वाटत होते. शितोळे सरकार यांच्यावर वारीचे संरक्षण करण्याची जबाबदारी आली. वारकऱ्यांच्या हातात असणारे टाळ हे वाजवण्याच्या बरोबर संरक्षणासाठी उपयुक्त होते. घोड्यावर जरीपटका घेतलेला शिपाई हे शिस्तबद्ध नियोजनाचे प्रतीक आहे. आज या सर्वांचे वंशज बाळासाहेब पवार अरफळकर, उर्जितसिंह शितोळे सरकार व चोपदार रंधवे बंधू ही सर्व वारीची जबाबदारी आनंदाने पार पाडत असतात.
आळंदीवरून पंढरपूरच्या दिशेने अखंड अशाप्रकारची पालखी सुरू झाली. काही काळ या पालखी सोहळ्यासाठी हत्ती, घोडे, औंधच्या पंत प्रतिनिधींकडून येत असत. त्या त्या काळच्या राजसत्तांनी पालखीसाठी आर्थिक मदत केल्याचे उल्लेखही आपणाला सापडतात. इंग्रज सरकारने पालखीची व्यवस्था होण्यासाठी इ.स. १८५२ मध्ये पंच कमिटी स्थापन केल्याचे आपल्या लक्षात येते.
‘पंढरीचा वास, चंद्रभागेस स्नान आणिक दर्शन विठोबाचे’ या इच्छेपोटी वारकरी पंढरपूरला जात असतो. आषाढी वारी ही प्रत्येक वारकरांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान असते. साधारणपणे वारकरी संप्रदायात कपाळावर गोपीचंदनाचा टिळा, हरीपाठाचे गायन, ग्रंथवाचन, भजन-कीर्तन, एकादशी व्रत, पंढरपूर वारी, सात्विक आहार, परोपकार आणि परमार्थ या प्रकारचे नियम सांगितले आहेत आणि वारकरी ते मनापासून पाळतात. एकनाथ महाराज नंतर तुकाराम महाराज यांच्या कालखंडात त्यांनीही वारी सुरू ठेवली. त्यांच्यानंतर त्यांच्या गावातून लोकांनी त्यांची पालखी पंढरपूरला आणायला सुरूवात केली. तुकाराम महाराजांचे पूर्वज विश्वंभर बाबा हेही पंढरीला येत असत. महाराष्ट्रातून निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, जनार्दन स्वामी, एकनाथ, गोरा कुंभार, गाडगेबाबा या संतांच्या पालख्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात.
लोकांची संख्या वाढल्यानंतर पुढे दिंडी ही संकल्पना विकसित झाली. वारकरी संप्रदायातील मान्यवरांनी आपापल्या दिंड्या या पालखीसोबत सुरू केल्या. या दिंड्यांना क्रमांक दिले जातात. रथाच्या पुढे व रथाच्या पाठीमागे अशाक्रमाने या दिंड्या मार्गस्थ होत असतात. आजचा सोहळा अतिशय विलोभनीय आहे. लाखो वारकरी जेव्हा पंढरपूरच्या दिशेने चालत असतात त्यावेळेला या सर्वांमध्ये एक स्वयंशिस्त असते. मोठ्या भक्तीभावनेने अभंग गायन करत हा जनसंप्रदाय चालत असतो. या सोहळ्याच्या दरम्यान विविध उत्सव होत असतात. रिंगण सोहळा हे यातील वैशिष्ठ्यपूर्ण परंपरा. चांदोबाचा लिंब, सदाशिवनगर, भंडीशेगाव, वाखरी आदी ठिकाणी हा रिंगण सोहळा होत असतो. पालखी माळशिरसच्या पुढे गेल्यानंतर वेळापूरच्याजवळ टेकडीवर ज्यावेळी येते त्यावेळी आता पंढरपूर जवळ आले आहे, आम्हाला विठ्ठल भक्तीची ओढ लागलेली आहे. म्हणून सर्व वारकरी धावतात. यालाच ‘धावा’ असे म्हणतात.
काळानुरूप वारीमध्ये खूप बदल झाला आहे. एक पन्नास वर्षापूर्वीची वारी आपण पाहिली तर वारकऱ्यांच्या बरोबर बैलगाड्या असत. सजवलेल्या बैलगाड्या वारकऱ्यांचे सामान वाहण्यासाठी उपयुक्त होत्या. वारीच्या रस्त्याच्या दुतर्फा जी गावे असत तेथून दर्शनाला येणारे लोक येताना जेवण घेवून येत असत. प्रत्येक स्त्रीच्या डोक्यावर टोपले आणि त्यामध्ये वारकऱ्यांसाठी जेवण असे. असे हजारो लोक या वारकऱ्यांना जेवण सुविधा पुरवत असत. ज्याठिकाणी पालखी मुक्कामाला थांबत होती त्याठिकाणी सर्व गावातील लोक जेवण घेवून येत असत व सर्वांची पंगत त्याठिकाणी बसत असे. वारकरी संप्रदायातील अतिशय पवित्र असा गोपाळकाला प्रत्येक गावोगावी होत असे. आज प्रत्येक ठिकाणी पालखी तळ आहे. मोठी सजावट करून त्याठिकाणी पालखी येते. प्रत्येक गावात पालखीच्या स्वागताच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. रांगोळी काढली जाते. पायघडी टाकली जाते. सारं गाव सुशोभित होते आणि गावातील लाखोंचा जनसमुदाय पालखीची वाट पहात रस्त्याच्या कडेला उभा असतो.
नातेपुते गावात पालखी प्रवेश करीत असताना गावच्या हद्दीत येते आणि शोभेच्या दारूकामाने सारे आकाश उजळून निघते. फटाक्यांच्या आवाजात माऊली गावात प्रवेश करतात. पालखी तळावर होणारा आरतीचा कार्यक्रम हा अतिशय भव्य आणि अप्रतिम असतो. एवढा लाखोंचा जनसमुदाय पण चोपदाराने दंड वर उचलताच शांत होतो. टाचणी पडलेल्याचा आवाज येईल अशी निरव शांतता काही क्षण असते आणि ‘आरती ज्ञानराजा’ म्हणून माऊलीच्या आरतीला सुरूवात होते. जो आरतीला उपस्थित असतो आपले जीवन धन्य झाले असल्याची भावना घेवून तेथून परततो. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा सोलापूर जिल्ह्यातील पहिला मुक्काम नातेपुते या ठिकाणी असतो. हजारो वर्षे हा आनंदसागर या परिसरामध्ये फुलत आहे. ही जी भक्तीची परंपरा आजही जन माणसाने उचलून धरली आहे.
............
भेदाभेद भ्रम अमंगळ
‘ज्ञानोबा-तुकाराम’ हा शब्द कानावर पडताच अवघे मन आनंदित होते, प्रसन्न होते. ही प्रसन्नता हा परिसर अनुभवतो आहे. या परंपरेने आम्हाला विचार दिला, आचाराचा मार्ग दाखवला, समतेची शिकवण दिली. भक्तीची शिकवण दिली. आपण सर्वजण समान आहोत, सर्वांवर दया करा, सर्वांशी स्नेह ठेवा. देवाच्या दारात भेदभाव नाही. भेदाभेद भ्रम अमंगळ, हा संत विचार दिला. म्हणूनच ही परंपरा श्रेष्ठ आहे, संपन्न आहे. जीवनदायींनी आहे. संत साहित्याने आम्हाला विचार पुरविला. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे, अशी संस्काराची शिदोरी पुरवली. म्हणूनच ज्ञानोबा- तुकाराम हे शब्द ऐकल्याबरोबर मराठी माणूस विचार संपन्न होतो, प्रसन्न होतो आणि भक्ती भावनेने त्याचे दोन्ही हात जोडले जातात आणि सहज तोंडातून शब्द बाहेर पडतो... ‘बोला पुंडलिक वरदा.... हरी विठ्ठल!’
....... पूर्ण......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

