

कसारा-मनमाड नव्या रेल्वेमार्गिकेसाठी सर्व्हेक्षण
३३४ हेक्टरचे संपादन; रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार
गौरव जोशी : सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १० : बहुचर्चित कसारा-मनमाड तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वेमार्गिकेसाठी (रेल्वेलाईन) रेल्वे मंत्रालयाने सर्व्हेक्षण सुरु केले आहे. १३१ किलो मीटरच्या या मार्गिकेसाठी साधारणत: ३३४ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या नव्या मार्गिकांमुळे रेल्वेगाड्यांचे वेग वाढणार आहे.
मध्य रेल्वेचा मुंबई ते भुसावळ हा सर्वाधिक वर्दळीचा मार्ग आहे. मुंबईला थेट उत्तर व पूर्व भारताशी जोडणाऱ्या या मार्गावर दिवसभरात शेकडो प्रवासी व मालवाहतूक रेल्वेगाड्या धावतात. परंतु, रेल्वेगाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दोन जुन्या मार्गिकांमुळे गाड्यांच्या नियोजनात अनेक अडचणी रेल्वे प्रशासनाला येत आहेत. त्यातही कसारा ते इगतपुरी या भागातील घाटामुळे रेल्वेगाड्यांना विलंब होत असून त्याचा फटका थेट प्रवाशांना सहन करावा लागतो आहे. त्यामुळे केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घालताना मध्य रेल्वेची ट्रफिक कोंडी सोडविण्यासाठी महत्वपूर्ण असे निर्णय घेतले आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळाने फेब्रुवारी महिन्यात कसारा ते मनमाड या १३१ किलोमीटरच्या अंतरात नव्याने दोन रेल्वेलाईन उभारण्यास हिरवा कंदिल दिला आहे. या प्रकल्पासाठी १० हजार १५४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून पाच वर्षात हे काम पूर्ण करण्याचे उदिष्ट आहे. त्यादृष्टीने आता रेल्वे मंत्रालयाने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. नवीन दोन मार्गिका उभारण्यासाठी आवश्यक सर्व्हेक्षण, भूसंपादन तसेच अन्य तांत्रिक बाबींच्या पूर्ततेवर भर दिला जात आहे. सर्व्हेक्षण पूर्ण झाल्यानंतर भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर केला जाईल, अशी माहिती मिळते आहे. नव्या मार्गिकेसाठी रेल्वे विभागाची तयारी बघता सन २०३० पर्यंत नाशिक-मुंबई रेल्वे प्रवास अधिक जलद होणार आहे.
पाच तालुक्यांत संपादन
नव्या दोन मार्गिकांसाठी पाच तालुक्यातील ४५ गावांत जमीन अधिग्रहण केले जाणार आहे. त्यामध्ये इगतपुरीचे चार, नाशिकचे १६, निफाडचे १७, चांदवडचे ७ तसेच नांदगाव तालुक्यातील एका गावाचा समावेश आहे. कसारा ते नांदगाव बुद्रुकपर्यंत बोगदा असणार असून तेथून पुढे जुन्या मार्गाला समांतर रेल्वेमार्गिका करण्यात येईल.
- कल्याण ते कसारा तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचे काम प्रगतिपथावर
- मनमाड ते भुसावळ तिसऱ्या आणि चौथी मार्गिका अंतिम टप्यात
- नव्या मार्गिकेमुळे नाशिक ते मुंबई लोकलसेवेचे स्वप्न दृष्टीक्षेपात
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.