टॅलेंट सर्च, द्वारकाई ब्लास्टर्सची विजयी सलामी
(उपशीर्षक)
जिल्हा टी-२० क्रिकेट स्पर्धा; पंकज महाजन, मनोज पाटील सामनावीर
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्ट्स ॲकॅडमी आयोजित आणि जैन इरिगेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसात टॅलेंट सर्च क्रिकेट क्लब आणि द्वारकाई ब्लास्टर्स स्पोर्ट्स क्लब यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर शानदार विजय मिळविला.
स्पर्धेतील पहिल्या सामन्यात टॅलेंट सर्च क्रिकेट क्लबने रंगरेज रॉयल्सचा ८६ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत टॅलेंट सर्चने २० षटकांत ५ बाद १५६ धावा उभारल्या. १५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रंगरेज रॉयल्सचा संपूर्ण संघ १९.१ षटकांत केवळ ७० धावांत गारद झाला. उत्कृष्ट फलंदाजीसाठी पंकज महाजन यांना सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
दुसऱ्या सामन्यात द्वारकाई ब्लास्टर्स स्पोर्ट्स क्लबने पाचोरा स्पोर्ट्सवर १३ धावांनी मात केली. प्रथम फलंदाजी करत द्वारकाई ब्लास्टर्सने २० षटकांत ८ बाद १४० धावा केल्या. प्रत्युत्तरात पाचोरा स्पोर्ट्सला २० षटकांत ८ बाद १२७ धावाच करता आल्या. द्वारकाई ब्लास्टर्सकडून मनोज पाटील (४), तर टिकू राठोड यांनी २ बळी घेतले. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या मनोज पाटील यांना सामनावीर पुरस्कार दिला.