NSK26H24076
जळगाव : बालनिरीक्षणगृहात येथे ढोल-ताशा व ध्वज पथकाचे वाद्यपूजन करताना मान्यवर.
------
ढोलपथक निर्मितीतून बालगृहातील
मुलांच्या कलागुणांना नवी दिशा
वाद्यपूजनाने सरावास उत्साहात प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.१६ : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटना संचलित मुला-मुलींच्या बालनिरीक्षणगृहात ढोल-ताशा पथकासह ध्वज पथकाच्या वाद्यपूजनाचा कार्यक्रम झाला. या उपक्रमामुळे बालगृहातील मुला-मुलींना कला व संस्कृतीची ओळख होण्याबरोबरच त्यांच्या मानसिक विकासाला सकारात्मक चालना मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
बालगृह अधीक्षक रविकिरण अहिरराव यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. बालकांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, शिस्त, संघभावना आणि सकारात्मकता निर्माण व्हावी या उद्देशाने शिवशक्ती ढोल-ताशा व ध्वज पथकाची स्थापना करण्यात आली आहे. वाद्यपूजनानंतर बालगृहातील मुला-मुलींनी ढोल-ताशा वादनाचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षा मयुरा निंबाळकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ऋषिकेश काळे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी, परिविक्षा अधिकारी महेंद्र पाटील, हरित सेना प्रमुख प्रवीण पाटील, शिवगंध ढोल-ताशा पथकाचे स्वप्नील शेटे व दीपक सोनार यांच्यासह बालगृहातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.