ज्वारी खरेदीला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
शेतकऱ्यांना दिलासा; किमान आधारभूत किमतीवर विक्रीची संधी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : राज्यातील ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत केंद्र व राज्य शासनाने किमान आधारभूत किमतीवर (एमएसपी) ज्वारी खरेदीची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे अध्यक्ष रोहित निकम, संचालक मंडळ व प्रशासनाने यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने शेतकऱ्यांना शासकीय दराने ज्वारी विक्रीची आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पणन मंत्री जयकुमार रावल, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन तसेच मंत्री संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला होता. केंद्राने त्यास मंजुरी देत मुदतवाढीचे आदेश जारी केले असून, खरेदी प्रक्रिया केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या अटी व शर्तींनुसार राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी एस. एस. मेने यांनी दिली. यंदा ज्वारीचे उत्पादन वाढल्याने खुल्या बाजारातील दर घसरले असून अनेक शेतकऱ्यांना एमएसपीपेक्षा कमी दराने विक्री करावी लागत होती. या पार्श्वभूमीवर मुदतवाढीचा निर्णय महत्त्वाचा ठरला आहे. पणन महासंघाचे अध्यक्ष निकम यांनी शेतकऱ्यांना घाईघाईने कमी दरात ज्वारी विकू नये, तर शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीवरच विक्री करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.