गुन्हे वृत्त
--
प्रवाशाची सोन्याची
चैन, रोकड लुटली
नाशिक : निमाणी बसस्थानकाजवळील सार्वजनिक शौचालयाजवळ एका प्रवाशाला मारहाण करून लुटल्याची घटना घडली. गजेंद्र युवराज सूर्यवंशी (२५, रा. अंबड) यांच्या फिर्यादीनुसार, बुधवारी (ता. १५) मधयरात्री निमाणी डेपो परिसरातून जात होते. या वेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी संशयितांनी अडविले. संशयितांनी गजेंद्र यांना मारहाण करून शिवीगाळ केली. त्यांच्या गळ्यातील ९० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन, २ हजार १६० रुपयांची रोकड, एसबीआय व युनियन बँकेचे एटीएम कार्ड असलेले लेदरचे पाकीट जबरदस्तीने हिसकावले. तसेच, जाताना जीवे मारण्याची धमकी देत पसार झाले. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल केला असून, सहायक निरीक्षक प्रशांत बोरसे तपास करीत आहेत.
---
अपॉइंटमेंट बुकिंगच्या
बहाण्याने फसवणूक
नाशिक : सायबर चोरट्यांनी एका व्यक्तीच्या पत्नीला गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. फिर्यादीनुसार, २५ जून ते ५ जुलैदरम्यान, अज्ञात मोबाईलवरून संशयिताने फिर्यादीच्या पत्नीला डॉक्टरांची अपॉइंटमेंट बुक करण्याचा बहाणा केला आणि ॲप्लिकेशन इन्स्टॉल करण्यास सांगितले. या ॲपच्या माध्यमातून सायबर चोरट्याने फिर्यादीच्या बँक खात्यातून ९ लाख ७५ हजार ६०१ रुपये काढून घेत फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ निरीक्षक सुशीला कोल्हे तपास करत आहेत.
--
अज्ञात वाहनाच्या
धडकेत तरुण ठार
नाशिक : मुंबई- आग्रा महामार्गावरील एचपी पेट्रोलपंपाजवळ रस्ता ओलांडणाऱ्या एका तरुणाला अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना घडली आहे. युनूस सलीम खान (३८, रा. बांदा, उत्तर प्रदेश) असे मृत तरुणाचे नाव आहे. युनूस रविवारी (ता. १२) रात्री महामार्गावरून पेट्रोलपंपाच्या दिशेने रस्ता ओलांडत होता. ओझरकडून द्वारकाकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने युनूसला जोराची धडक दिली. या अपघातात डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने यूनूसचा मृत्यू झाला. अपघात करून चालक वाहनासह पळून गेला. याप्रकरणी फिर्यादी इसरार मुमताज खान (रा. जुने नाशिक) यांच्या फिर्यादीवरून आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार आहेर तपास करीत आहेत.
--
तरुणाला मारहाण;
फोन हिसकावला
नाशिक : शरणपूर रोडवरील शांतारामबापू वावरे चौकात एका तरुणाला अडवून पाठीला चावा घेत लुटल्याची घटना समोर आली आहे. अभिषेक भारत जगताप (२०, रा. गंगापूर रोड, मूळ रा. मालेगाव कॅम्प) याच्या फिर्यादीनुसार, तो सोमवारी (ता. १३) रात्री मित्र जयेश भामरे याच्यासह बुलेटवरून कॅनडा कॉर्नरकडून दूध बाजाराकडे जात होता. ते राजीव गांधी भवनाजवळ आले असता संशयित सचिन महाजन व त्याच्या ६ ते ७ अनोळखी साथीदारांनी दुचाकीवरून येत त्यांना अडवले. संशयितांनी अभिषेकला मारहाण, दमदाटी करत त्याच्या पाठीचा चावा घेतला आणि त्याच्याकडील ॲपल कंपनीचा मोबाईल व १०० ग्रॅम वजनाची चांदीची चैन चोरून नेली. सरकारवाडा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.
---
कुरापत काढून
महिलेला मारहाण
नाशिक : वासननगर येथील महालक्ष्मी दर्शन रो-हाऊस परिसरात मागील भांडणाची कुरापत काढून एका ६० वर्षीय महिलेला गंभीर मारहाण करण्यात आली. सुलोचना दीपक गोलाईत (६०) व त्यांची सून आरती गोलाईत या सोमवारी (ता. १३) सकाळी कॉलनीत भाजी घेत असताना संशयित रत्नमाला किरण कुलकर्णी (रा. वासननगर) हिने जुन्या तक्रारीचा राग मनात धरून त्यांना शिवीगाळ केली आणि सुनेच्या पाठीत चप्पल मारली. सुलोचना यांनी जाब विचारला असता, रत्नमाला हिने लाकडी दांडक्याने सुलोचना यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर जोराने मारून हात फॅक्चर केला. तसेच घराच्या सेफ्टी गेटच्या आत प्रवेश करून मुख्य दरवाजावर लाथा मारल्या व घराबाहेर उभी असलेली ॲक्टिव्हा मोपेड खाली पाडून नुकसान केले. इंदिरानगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून सहायक निरीक्षक अंकोलीकर तपास करीत आहेत.
---
वडाळागावात
दोन गटांत हाणामारी
नाशिक : वडाळागावातील मेहबूबनगर गल्लीत सार्वजनिक नळाला खराब पाणी येत असल्याच्या कारणावरून आयोजित बैठकीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात परम्परांविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. हीना इरफान शेख ( ३०) याच्या फिर्यादीनुसार, बैठकीदरम्यान संशयित इम्तियाज नूरमोहम्मद शेख, अज्जू नूरमोहम्मद शेख, वसीम नूरमोहम्मद शेख, शोयेब इम्तियाज शेख, कैफ इम्तियाज शेख, कदीर शेख आणि शादाब इम्तियाज शेख तेथे आले. ‘हा एरिया तुमच्या बापाचा आहे का? असे म्हणत इम्तियाज शेख याने हातातील स्टीलच्या बादलीने हीना यांच्या पतीच्या डोक्यात मारून जखमी केले व इतरांनी मारहाण-दमदाटी केली. तर, रुक्साना इजाज शेख (४०) यांच्या फिर्यादीनुसार, बैठकीत संशयित इरफान शेख, उबेद शेख, आत्मश शेख, फारुख शेख, इर्शत मिर्झा, अरबाज शेख आणि साहिल शेख यांनी येत आरडाओरडा केला. इरफान शेख याने लाकडी दांडक्याने रुक्साना यांचे जेठ इम्तियाज व वसीम यांना मारहाण केली. सोडविण्यास गेलेल्या रुक्साना यांच्या गळ्यातील सोन्याची पोत ओढून ती तोडली आणि गहाळ केली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल केला असून, सहायक निरीक्षक अंकोलीकर या दोन्ही गुन्ह्यांचा तपास करत आहेत.
---
हॉटेलचालकावर
कोयत्याने वार
नाशिक : पंचक येथील शनी मंदिरासमोर हॉटेलचालकाकडे वस्तूंचे पैसे मागितल्याच्या रागातून एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. आमीर राजू शार्दुल (२४, रा. पंचकगाव) यांच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (ता. १४) सकाळी हॉटेलमध्ये चुलत भाऊ नितीन शार्दुलसह काम करत होते. या वेळी संशयित गौरव बलसाणे व त्याचे दोन साथीदार आले आणि वस्तू घेऊन पैसे न देताच जाऊ लागले. आमीर यांनी पैशांची मागणी केली असता, गौरवने शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच सोबत आणलेला कोयता काढून आमीर यांच्या गळ्यावर थेट वार केला. आमीर यांनी प्रसंगावधान राखून खाली वाकल्याने वार चुकला आणि त्यांचा जीव थोडक्यात वाचला. नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, हवालदार भोळे तपास करीत आहेत.