शहर- परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट
चोऱ्या, घरफोड्यांसह तीन वाहने चोरीला
...
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : शहर- परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, उपनगरातून पीकअपच्या स्टेफनीसह दुचाकी, वाहनातील इंधनाची चोरी केल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सिद्धेश्वर ज्योतिराम मेश्राम (५२, रा. चिखमी, मुर्तीजापूर, जि. अकोला) यांनी त्यांचा पीकअप बोलेरो बुधवारी (ता. १५) पहाटे महामार्गावरील करण हॉटेलसमोर पार्क केला असता, कारमधून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी १० हजारांची स्टेफनी चोरून नेली. तर, रोहित संजय गिरासे (रा. अशोका मार्ग) यांच्या फिर्यादीनुसार, तपोवनातील एसटीपी येथील रोहित्रातील ५० हजारांचे कॉपर वाईंडिग व अन्य साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. चंद्रशेखर साळवे (रा. सामनगाव) यांनी एकलहरी पेट्रोलपंपाजवळ पार्क केलेल्या ट्रक आणि टँकरच्या टाकीचे नट-बोल्ट अज्ञात चोरट्याने उघडले आणि टाकीतून २५ हजार रुपयांचे अडीचशे लिटर इंधन चोरून नेले. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
--
तीन दुचाक्या चोरीला
ठक्कर बाजार परिसरातून ज्ञानेश्वर बेडीस (रा. तिडके कॉलनी) यांची दुचाकी (एमएच- ४१- एजे- ५४८५) चोरीला गेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तर भगूर नाक्यावरून तुकाराम शिरोळे यांची दुचाकी (एमएच- १५- जीक्यू- ९८३६) अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. आकाश साळुंके यांची दुचाकी (एमएच- २०- इएच- ८४७६) सिन्नर फाट्यावरील शुभम अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरीला गेली. याप्रकरणी नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.