टुडे १
NSK26H24177 (संग्रहित छायाचित्र)
---
अजिंठा चौक ते विमानतळ मार्ग पथदीपांनी उजळणार
उपशीर्षक
नियोजन समितीतून मिळणार ५ कोटी; आमदार भोळेंच्या प्रयत्नांना यश
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : शहरातील रस्ते सुरक्षित, सुशोभित व आधुनिक करण्याच्या उद्देशाने आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून अपारंपरिक ऊर्जा विकास लेखाशीर्ष अंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शहरातील अजिंठा चौफुली ते विमानतळाकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गावर आधुनिक एलईडी पथदीप उभारण्यासाठी ५ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे.
या मंजुरीमुळे अजिंठा चौफुली ते विमानतळाकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गावर आधुनिक एलईडी पथदिव्यांची उभारणी करण्यात येणार असून, या मार्गावरील प्रकाश व्यवस्था अधिक सक्षम होईल. त्यामुळे वाहनचालक, पादचारी, नागरिक तसेच विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेत मोठी भर पडणार आहे. याशिवाय शहराच्या सौंदर्यातही लक्षणीय वाढ होणार आहे.
या कामासाठी आमदार श्री. भोळे यांनी मागील दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला. या प्रस्तावास जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन यांचे विशेष सहकार्य लाभले असून, त्यांच्या पाठपुराव्यामुळे निधी मंजुरीची प्रक्रिया गतीने पूर्ण झाली.
---
कोट..
जळगाव शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध पायाभूत सुविधांच्या कामांसाठी माझा सातत्याने पाठपुरावा सुरू असून, आगामी काळातही शहरासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून आणण्याचा प्रयत्न सुरू राहील. नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हेच प्रमुख उद्दिष्ट आहे.
- सुरेश भोळे (राजूमामा)
आमदार, जळगाव शहर
------