पन्नास वर्षीय रुग्ण ‘स्किझोफ्रेनिया’तून बाहेर
उपशीर्षक
डॉ. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञांना यश
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीनंतर मानसिक आजाराने त्रस्त झालेल्या ५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया या गंभीर मानसिक आजारावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मानसोपचार विभागाने समुपदेशन व औषधोपचारांच्या माध्यमातून यशस्वी उपचार करून रुग्णाला नवजीवन दिले आहे.
विशेष म्हणजे शासनाच्या योजनेंतर्गत या रुग्णावर मोफत उपचार करण्यात आले. काही वर्षांपूर्वी डोक्याला गंभीर मार लागल्यानंतर संबंधित रुग्णाच्या वागणुकीत हळूहळू बदल होऊ लागले. तो स्वतःशीच सतत बडबड करणे, कोणतेही कारण नसताना अचानक रडू येणे, कुटुंबातील सदस्यांवर विनाकारण संशय घेणे, कोणाशीही संवाद न साधणे तसेच जेवण करण्यास नकार देणे अशा गंभीर मानसिक लक्षणांमुळे कुटुंबीय मोठ्या चिंतेत होते. कुटुंबीयांनी रुग्णास वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.
रुग्णाची मानसोपचार विभागातील तज्ज्ञ डॉ. हुमेद महाडीक यांच्यासह पथकाने तपासणीअंती स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराचे निदान केले. त्यानंतर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार, नियमित समुपदेशन, मानसिक स्थितीचे सातत्याने निरीक्षण तसेच कुटुंबीयांनाही आजाराविषयी योग्य मार्गदर्शन करण्यात आले. समन्वयातून उपचार केल्यामुळे रुग्णाच्या प्रकृतीत टप्प्याटप्प्याने लक्षणीय सुधारणा दिसून आली. उपचारानंतर रुग्णाची स्वतःशी बडबड करण्याची सवय कमी झाली असून, संशयी वृत्तीवर नियंत्रण आले आहे.
-------