फोटो : H24185
खेळाडूंसाठी दर्जेदार सुविधा उभाराव्यात
आयुष प्रसाद : जिल्हा क्रीडा संकुल समिती बैठक
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : राज्याच्या क्रीडा धोरणांतर्गत उभारण्यात येत असलेल्या जिल्हा क्रीडा संकुलाचे काम गुणवत्तापूर्ण आणि निर्धारित कालावधीत पूर्ण करावे. क्रीडा संकुलात खेळाडूंसाठी दर्जेदार सुविधा उभारण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय राखत कामाला गती द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (ता. १६) जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी प्रसाद बोलत होते. ते म्हणाले, जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामांना गती द्यावी. काम ८० टक्के पूर्ण झाल्यानंतर आवश्यक फर्निचरसाठी सविस्तर प्रस्ताव सादर करावा. संकुलातील रेकॉर्ड रुमसाठी स्थानिक विकास निधीकरिता स्वतंत्र प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश आयुष प्रसाद यांनी दिले. जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता अभिजित शेलार, महापालिका क्रीडा अधिकारी श्रीमती पगारे, तालुका क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, शिक्षण विस्तार अधिकारी संतोष झोले, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) नरेश पाटील, मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी दत्तू भोकनळ, आकाश शिंदे व संबंधित विभागांचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. बैठकीत २०२६-२७ मध्ये तालुका ते राज्यस्तरापर्यंत क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठीच्या संभाव्य खर्चाचे अंदाजपत्रकास समितीने मान्यता दिली.