फोटो : A14166
नाशिक : चिखलमय झालेला द्वारका ते ट्रॅक्टर हाऊस सर्विस रोड
--
झाकिर हुसेन रुग्णालयाचा मार्ग चिखलमय
खोदकामामुळे रुग्ण व रुग्णवाहिकांची कोंडी
जुने नाशिक, ता. १५ : द्वारका सर्व्हिस रोडवर झालेल्या खोदकामामुळे डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयाची वाट अत्यंत बिकट झाली आहे. या मुख्य रस्त्याची दुरुस्ती वेळेत न झाल्याने रुग्ण, पादचारी आणि रुग्णवाहिकांना चिखलातून वाट काढावी लागत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
केबल आणि पाइपलाइन टाकण्यासाठी द्वारका चौक ते ट्रॅक्टर हाऊस दरम्यानच्या सर्व्हिस रोडचे खोदकाम करण्यात आले होते. मात्र, कामातील माती रस्त्यावरच ठेवण्यात आल्याने गेल्या आठवड्यातील पावसाने येथे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले. रस्ता खचलेल्या ठिकाणी केवळ माती टाकून खड्डे बुजवल्याने हा संपूर्ण मार्ग दलदलीत रूपांतरित झाला आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे चिखल सुकला असला, तरी रस्ता ओबडधोबड झाला असून उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना डोळ्यांचे आजार होत आहेत.
महापालिकेचे हे मुख्य रुग्णालय असल्याने येथे रुग्णवाहिका आणि नागरिकांची सतत वर्दळ असते. मात्र, येथील कामे अत्यंत संथ गतीने सुरू असून मध्यंतरी ती बंदही होती. या दुरवस्थेमुळे अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने या मार्गाचे तातडीने डांबरीकरण किंवा कॉंक्रिटीकरण करावे आणि रस्त्यावरील अनधिकृत वाहनांचा थांबा हटवावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.