पीडितांवरील अन्यायप्रकरणी गुन्हा नोंदवण्यास नकार 
असा प्रकार न घडल्याचा पोलिसांचा दावा ः विविध संघटना आक्रमक

पीडितांवरील अन्यायप्रकरणी गुन्हा नोंदवण्यास नकार असा प्रकार न घडल्याचा पोलिसांचा दावा ः विविध संघटना आक्रमक

Published on

पुणे/कोथरूड, ता. ४ : कोथरूडमधील पीडित महिलांनी मानवी व कायदेशीर हक्कांची पायमल्ली झाल्याच्या विरोधात तसेच, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याअंतर्गत पोलिसांविरुद्ध तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला. परंतु ४८ तास उलटून देखील पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला नाही. मात्र, दुसरीकडे असा प्रकार घडलेला नाही, असे सांगत या प्रकरणात गुन्हा दाखल करता येणार नसल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे विरोधी पक्षांसह विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विवाहित महिला पतीच्या अत्याचाराला कंटाळून काही दिवसांपूर्वी पुण्यात आली. सामाजिक क्षेत्रातील महिलांनी पुढाकार घेत तिला ‘वन स्टॉप सखी सेंटर’ येथे दाखल करण्यास मदत केली. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी पीडित महिलेने त्यांच्या मदतीने कौशल्य विकास वर्ग देखील लावला.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमधील पोलिसांनी तिच्या चौकशीसाठी कोथरूड पोलिसांची मदत घेतली. त्या महिलेला मदत करणाऱ्या तीन सामाजिक कार्यकर्त्या महिलांना कोणतीही पूर्वसूचना न देता ताब्यात घेतले. कोणताही कायदेशीर दस्तावेज वा कारण न देता, तिघींनाही जबरदस्तीने पोलिस ठाण्यात नेऊन, त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले, पासवर्ड बदलण्यात आले. त्यांना बेदम मारहाण केली. या महिलेच्या नातेवाइकांपैकी एक संभाजीनगरमधील निवृत्त पोलिस उपनिरीक्षकाने पदाचा गैरवापर करून, पुण्यात ओळखीच्या पोलिसांची टीम आणली. मदत करणाऱ्या महिलांना गुन्हेगारासारखी वागणूक देत, जातिवाचक शिवीगाळ, बेदम मारहाण, लज्जास्पद वागणूक दिली. मदत करणाऱ्या महिलांना कोणतेही वैध कारण न देता त्यांच्या राहत्या घरातून जबरदस्तीने ताब्यात घेण्यात आले आहे, असा गंभीर आरोप संबंधित महिलांनी केला आहे.
‘‘पोलिसांकडून अशी वागणूक मिळत असेल तर भविष्यात कोणीही पुढे येऊन कुठल्या पीडितांना मदत करायला धजावणार नाही. सामान्यांच्या सुरक्षिततेसाठी नियुक्त पोलिस, ताकदवान लोकांच्या दबावाखाली कसे बेकायदेशीर काम करतात, आपल्या अधिकारांचा गैरवापर करतात हे या घटनेतून स्पष्ट होत आहे.’’ असा आरोप या पीडित महिलांनी केला आहे.
दरम्यान, पोलिस निरीक्षक संदीप देशमाने यांनी या प्रकरणात काही तथ्य असल्यास निश्चितपणे दोषींवर कारवाई करू, असे सांगितले.

दोषींवर कारवाई करा ः आठवले
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पुणे शहर, मनसे, मातंग समाज सेवा ट्रस्ट यांच्यावतीने करण्यात आली. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी फोनद्वारे दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
-----
‘‘संबंधित महिलांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही. असा प्रकार घडलेला नाही. तसेच, या घटनेत प्रथमदर्शनी कोणी साक्षीदार असल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल होणार नाही, असे संबंधितांना लेखी स्वरूपात कळविण्यात आले आहे.
- संभाजी कदम, पोलिस उपायुक्त, परिमंडळ तीन.
------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com