स्वरझंकार महोत्सवाचा सुरेल प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वरझंकार महोत्सवाचा सुरेल प्रारंभ
स्वरझंकार महोत्सवाचा सुरेल प्रारंभ

स्वरझंकार महोत्सवाचा सुरेल प्रारंभ

sakal_logo
By

पुणे, ता. ५ : डॉ. मीता पंडित यांचे शास्त्रीय गायन, राहुल शर्मा यांचे बहारदार संतूरवादन आणि राहुल देशपांडे यांचा द राहुल देशपांडे कलेक्टिव्हस हा वैविध्यपूर्ण रचनांचा कार्यक्रम, अशा सुरेल वातावरणात गुरुवारी व्हायोलिन अकादमीतर्फे आयोजित १४ व्या स्वरझंकार संगीत महोत्सवास सुरुवात झाली.
महोत्सवाचे उद्‍घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. यावेळी व्हायोलिन अकादमीचे पं. अतुलकुमार उपाध्ये उपस्थित होते. पहिल्या सत्रात डॉ. मीता पंडित यांची मैफील रसिकांनी अनुभवली. त्यांनी भीमपलास रागात ‘अब तो बडी बेर’ बंदिश, ‘साडे नाल वे’ ही पंजाबी रचना व तीन तालातील तराणा सादर केला. ‘केसरिया बालम’ या लोकप्रिय रचनेनी त्यांनी गायनाची सांगता केली. त्यांना भरत कामत यांनी तबल्यावर, मिलिंद कुलकर्णी यांनी हार्मोनिअमवर आणि निशिगंधा देशपांडे व ऋतुराज कोळपे यांनी तानपुऱ्यावर साथसंगत केली. त्यानंतर पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य व पुत्र राहुल शर्मा यांचे संतूरवादन झाले. त्यांनी राग जनसंमोहिनीने वादनाला प्रारंभ केला. त्यामध्ये आलाप, जोड, झाला, रूपक तालात एक मध्यलय रचना, त्यानंतर तीनतालात द्रुत रचनेचे सादरीकरण केले. पहाडी धून सादर करत त्यांनी आपल्या वादनाचा समारोप केला. त्यांना आदित्य कल्याणपूर यांनी तबल्यावर साथ केली. पहिल्या दिवसाचा समारोप राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक राहुल देशपांडे यांनी सादर केलेल्या ‘द राहुल देशपांडे कलेक्टिव्हस’ या लोकप्रिय कार्यक्रमाद्वारे झाला. त्यांनी ‘मी वसंतराव’ चित्रपटात त्यांनी गायलेली बंदिश ‘पवन चलत’, तसेच ‘गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे’, ‘घर थकलेले संन्यासी’, ‘मोगरा फुलला’ अशा एकाहून एक सरस रचना सादर केल्या.