
सगळंच नको छान-छान करा थोडा तरी अपमान!
आजही ऑफिसला यायला उशीर झाल्याने मुकेशच्या अंगावर काटा आला. आजही साहेब आपली सर्वांदेखत बिनपाण्याने करणार, याची त्याला खात्री होती. उशिरा येण्याचे काय कारण सांगावं, याचा तो विचार करू लागला. तेवढ्यात साहेबच समोर आले.
‘‘सॉरी सर उशीर...’’. पण मुकेशला थांबवत साहेबच म्हणाले, ‘‘मुकेशराव, थोडा-फार उशीर चालायचाच. त्यात एवढं काय? तुम्ही फार प्रामाणिक आणि शिस्तप्रिय आहात, याची मला कल्पना आहे.’’ सर्वांदेखत साहेबांनी असं म्हटल्यावर मुकेशची कॉलर ताठ झाली. पण साहेबांनी खरंच आपलं कौतुक केलं की उपरोधानं म्हटलंय, या विचाराने तो पुन्हा चिंतेत पडला. मात्र, दिवसभरात चार-पाच वेळा साहेब हसून बोलल्याने मुकेशच्या मनावरील तणाव निवळला. दुपारी खडूस हेडक्लार्कही त्याच्याशी प्रेमाने बोलला. लंचच्या सुटीत त्याने डब्यातील गाजराचा हलवाही मुकेशला दिला. ‘‘सर, रोज अपमान गिळायची मला सवय आहे. त्यामुळे तुमचा हलवा माझ्या गळ्याखाली उतरेल का?’’ असा करुणरसपर विनोद मुकेशने केला. त्याला हेडक्लार्कने हसून दाद दिली. जेवण झाल्यानंतर मुकेश कामात दंग झाला. सायंकाळी घरी निघताना कधी नव्हे ती सारिका त्याच्याकडे पाहून गोड हसली. त्या धुंदीतच तो गाडी चालवू लागला. त्यामुळे त्याच्या हातून सिग्नल तुटला. आता पोलिस आपली खरडपट्टी काढणार, याची त्याला खात्री पटली. तेवढ्यात हवालदारसाहेब म्हणाले, ‘‘साहेब, काळजी घ्या. सिग्नल तोडल्यावर अपघात झाल्यावर केवढ्याला पडेल. परत असं करू नका.’’ असं म्हणून त्याला जायला सांगितले. थोडं पुढं आल्यानंतर त्याची दुचाकी दुसऱ्या गाडीला घासली. ‘आता आपलं काय खरं नाही. पब्लिकसमोर आपला अपमान होणार’ असं त्याला वाटलं. मात्र, ‘‘दादा, तुम्हाला लागलं तर नाही ना?’’ अशी विचारणा गाडी घासलेल्या चालकाने केली. ‘‘नाही...नाही...’’ असं म्हणून त्याचा विचार बदलण्याच्या आत मुकेश सुसाट सुटला. घरी आल्यानंतर दीप्तीने त्याच्या हातात गरमागरम चहाचा कप दिला. ‘अरे हे काय चाललंय? अनेकांना संधी असूनही, आपला अपमान दिवसभरात कोणीही केला नाही. हे आश्चर्य कसं काय घडलं’ हा विचार तो करू लागला. सकाळी उठल्यानंतरही बायको प्रेमाने वागत होती. त्यानंतर ऑफिसला आजही त्याला उशीर झाला पण साहेबांनी अपमान करण्याऐवजी चहा पाजल्याने त्याचा बीपी वाढला. त्यानंतर पुढचे तीन-चार दिवस असेच प्रेमाने गेले. आता मात्र तो अस्वस्थ झाला. कोणी प्रेमाने बोलू लागले की त्याचा बीपी आणि शुगर वाढू लागली. अकारण त्याला घाम फुटू लागला. मग नाइलाजाने तो डॉक्टरांकडे गेला. त्यांनी रक्त तपासणीसाठी दिले. रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टर एकदम गंभीर झाले.
‘‘मि. मुकेश, तुमच्या रक्तात अपमानाची कमतरता आहे. त्यामुळे तुम्हाला हा त्रास होतोय. लवकरात लवकर तुम्ही अनेकांकडून अपमान करून घ्या. तरच तुमची तब्येत ठणठणीत होईल.’’ डॉक्टरांचे बोलणं ऐकून मुकेश थेट बॅंकेत गेला. तिथं तीन-चार खिडक्यांतील कर्मचाऱ्यांकडून खेकसून घेतल्यावर एके ठिकाणी तो उभा राहिला. ‘‘ओ, रांगेत उभे राहा,’’ असं कॅशियरने त्याला ठणकावलं. अर्ध्या तासानंतर त्याचा नंबर आला. त्याची स्लीप बघून कॅशियर त्याच्यावर खेकसला. ‘‘शाळा वगैरे शिकला की नाही? पैसे काढण्याची स्लीप अशी भरतात का? कधीतरी डोक्याचा वापर करा. आमच्या डोक्याला किती ताप देता. आम्हाला काय एवढंच काम आहे का? पुन्हा ती स्लीप भरा.’’ असं म्हणून कॅशियरने ‘लंचब्रेक’ अशी पाटी लावून खिडकी धाडदिशी आदळली. कॅशियरकडून झालेल्या अपमानाने मुकेशच्या चेहऱ्यावर तरतरीतपणा आला. आनंदाने त्याचा चेहरा फुलला. त्याचा बीपी आणि शुगरही आटोक्यात आली.