करावे तसे भरावे आता काय करावे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

करावे तसे भरावे
आता काय करावे?
करावे तसे भरावे आता काय करावे?

करावे तसे भरावे आता काय करावे?

sakal_logo
By

दुपारी दोनला लागोपाठ तीन वेळा दरवाजाची कडी वाजल्याने जनूभाऊंचा रागाचा पारा चढला. झोप अर्धवट झाल्याने त्यांची चिडचिड वाढली. ‘आता या वेळेला कोण कडमडलं’ असं म्हणून ते दरवाजा उघडण्यासाठी उठले. ‘‘कोणऽऽहेऽऽ’’ त्रासिकपणे ते ओरडले.
‘‘अहो, बेल बंद असल्याने दोन-तीन वेळा कडी वाजवली.’’ समोरच्या व्यक्तीने उत्तर दिले. ‘‘अहो, बेल बंद आहे, हे कोणी कडी वाजवून सांगतं का? दुपारी आमची वामकुक्षीची वेळ असल्याने आम्हीच ती १ ते ४ बंद ठेवतो.’’ जनूभाऊंनी चिडून उत्तर दिले. ‘‘अहो मग १ ते ४ बेल बंद राहील, अशी पाटी का लावली नाही. दहा मिनिटे बेल वाजवून मी थकून गेलो ना. नंतर मी कडी वाजवायला लागलो.’’ समोरच्या व्यक्तीने उत्तर दिले. ‘‘आता तेवढीच पाटी राहिलीय. पण तुम्ही कशासाठी आला होतात ते सांगा.’’ जनूभाऊंनी विचारले. ‘‘पाणी...’’ त्या व्यक्तीने एवढेच म्हणताच जनूभाऊ कडाडले. ‘‘म्हणजे? तुम्हाला प्यायला पाणी हवंय म्हणून तुम्ही आमची झोपमोड केलीत. हा अत्यंत अक्षम्य अपराध तुम्ही केलाय. याबद्दल मी पोलिसांत तक्रार करीन,’’ जनूभाऊंनी म्हटले.
‘‘अहो, मी प्लंबर आहे. तुमच्या घरात पाणी नीट येत नाही, अशी तक्रार तुम्ही सोसायटीकडे केली होतीत. त्यामुळे सोसायटीचे चेअरमन कारंडे यांनी मला तुमच्या घरातील नळजोडाचं चेकिंग करण्यासाठी पाठवलंय.’’ प्लंबरने उत्तर दिले. ‘‘अच्छा! कारंडेने पाठवलंय काय? आलं सगळं लक्षात. त्यांनी मुद्दाम माझ्या घरी दुपारी दोन वाजता जा, असं सांगितलं असेल. आम्हाला शांतचित्ताने दुपारची झोपही लागू नये, यासाठी सगळी त्यांची धडपड चालू असते.’’ पण प्लंबरने जनूभाऊंच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं व निमूटपणे ते नळाची एकेक जोडणी तपासू लागले. साडेचार वाजेपर्यंत त्याने काम पूर्ण केले. ‘‘साहेब, दोन ठिकाणी तुमच्याच पाईपमध्ये प्रॉब्लेम होता. तो दुरुस्त केलाय.’’ असे उत्तर देऊन प्लंबर निघून गेला. आता साडेचार वाजून गेल्याने जनूभाऊंच्या झोपेचे खोबरे झाले होते आणि याला फक्त कारंडेच जबाबदार आहेत, असा ठाम विश्वास जनूभाऊंना होता. त्यामुळे त्यांना जाब विचारण्यासाठी लगेचच ते त्यांच्या घरी गेले. पण ते रात्रपाळीला कामावर गेले असून, पहाटे चार वाजता येतील, असे त्यांच्या मिसेसने सांगितले. पहाटे चार वाजेपर्यंत जागे राहून, आल्या आल्या त्यांना जाब विचारावा, असं जनूभाऊंनी ठरवले पण कावेरीबाईंनी त्यांना विरोध केला. ‘‘जे काय त्यांना बोलायचंय, ते सकाळी बोला,’’ अशी तंबी दिली. मग मात्र, त्यांचा नाईलाज झाला. कधी एकदा सकाळ होतेय आणि कारंडे यांना आपण जाब विचारतोय, असं त्यांना झालं. सकाळी बरोबर सहा वाजता त्यांनी कारंडे यांची बेल वाजवली. त्यांच्या मिसेसने दार उघडले. ‘‘ते पहाटे साडेचारला झोपलेत. अकरा वाजता उठतील.’’ त्यांच्या मिसेसने उत्तर दिले. ‘‘माझं महत्वाचं काम आहे. उठवा त्यांना.’’ जनूभाऊंनी म्हटले. त्यानंतर जांभया देत कारंडे दरवाजात आले. ‘‘जनूभाऊ, एवढं काय महत्वाचं काम काढलंत?’’ कारंडे यांनी जांभईच्या सुरात विचारलं. ‘‘कारंडे, हा काय प्रकार आहे? ज्येष्ठ नागरिकांनी दुपारची वामकुक्षी घेऊ नये, असं काय तुम्ही ठरवलंय का? सभासदांना त्रास देण्यासाठी आम्ही तुम्हाला चेअरमन केलंय का? काल दुपारी दोन वाजता एका प्लंबरला माझ्या घरी का पाठवले होते? माझी झोपमोड व्हावी, हाच तुमचा उद्देश होता ना?’’ एका दमात जनूभाऊंनी प्रश्नांची सरबत्ती केली.
‘‘नाही हो. पण तुम्हीही माझी झोपमोड केलीत ना.’’ जडावलेल्या डोळ्यांनी कारंडे यांनी म्हटलं. ‘‘तुम्ही माझी काल झोपमोड केलीत. त्यामुळे तुमचीही झोपमोड आज झाली. करावे तसे भरावे.’’ असे म्हणून जनूभाऊ हसतमुखाने घरी आले आणि इकडे कारंडे यांच्या झोपेचं खोबरं झाल्याने, ते चिडचिड करू लागले. शेवटी तेच खोबरं उधळत ते झोपेची आराधना करू लागले.