एरो इंडियाला आजपासून सुरवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एरो इंडियाला आजपासून सुरवात
एरो इंडियाला आजपासून सुरवात

एरो इंडियाला आजपासून सुरवात

sakal_logo
By

बंगळूर, ता. १२ : भारतीय हवाई दलाच्या वतीने १४ व्या ‘एरो इंडिया’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याची सुरवात सोमवारपासून (ता. १३) बंगळूर येथे होणार आहे. एरो इंडिया हा हवाईदलाचा आशिया खंडातील सर्वात मोठा लढाऊ विमानांच्या कवायती सादर करणारा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेअंतर्गत संरक्षण क्षेत्रातील कामगिरी पाहायला मिळणार आहे.
बंगळूर येथील येलंका एअर फोर्स स्टेशन येथे हा कार्यक्रम १७ फेब्रुवारीपर्यंत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्‍घाटन होणार असून यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक चौधरी उपस्थित राहणार आहेत.
एरो इंडिया उपक्रमात जगभरातील हवाईदलाशी निगडित विविध देशांचे प्रतिनिधी, उद्योजक, गुंतवणूकदार, संशोधक आदींचा सहभाग असतो. या पाच दिवसीय कार्यक्रमात विविध प्रकारच्या विमानांच्या हवाई कसरती, प्रात्यक्षिके, युद्ध कौशल्याची क्षमता प्रदर्शन, परिषद, चर्चासत्र, संरक्षण उत्पादनांचे प्रदर्शन आदींचा समावेश आहे.
देशातील संरक्षण संशोधन आणि विकास परिसंस्थेच्या विविध भागधारकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करत संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेद्वारे (डीआरडीओ) या कार्यक्रमात सहभाग घेणार आहे. तसेच डीआरडीओ आपल्या स्वदेशी उत्पादने व तंत्रज्ञानाचे विस्तृत श्रेणी प्रदर्शित करेल. यामुळे संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योग, स्टार्टअप, संस्था यांना याचा अनुभव घेता येणार आहे. १९९६ पासून बंगळूर येथे ऐरो इंडिया उपक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आले असून आतापर्यंत १३ वेळा हा कार्यक्रम झाला आहे.

एचएएलतर्फे आत्मनिर्भर भारताचे प्रदर्शन
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) तर्फे यंदा ‘एरो इंडिया’मध्ये ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेवर भर देण्यात आला आहे. या कार्यक्रमादरम्यान एचएएलचा वतीने १५ हेलिकॉप्टरचा वापर करत आकाशात ‘आत्मनिर्भर’ असे फॉर्मेशन साकारण्यात येणार आहे. या सादरीकरणात एचएएलद्वारे निर्मिती करण्यात आलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या विमानांचा समावेश आहे. त्यात प्रचंड हे हलके लढाऊ हेलिकॉप्टर (एलसीएच), ॲडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर (एएलएच), लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर (एलयूएच) आदींचा समावेश आहे.

एरो इंडियामध्ये....
एकूण प्रदर्शक : ८०९
भारतीय प्रदर्शक : ६९९
परदेशातील प्रदर्शक : ११०