
‘फर्ग्युसन’, ‘बीएमसीसी’सह नऊ संघ अंतिम फेरीत
पुणे, ता. १५ : फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल बुधवारी रात्री जाहीर झाला. यंदा फर्ग्युसन महाविद्यालय, बीएमसीसी, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयासह नऊ महाविद्यालयांच्या संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
निवड झालेल्या संघांमध्ये डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी (सांबरी), पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (मोहपाश), बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय (तुम बहते रहना), सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय (रिवाज), महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (बंबई मेरी जान), जयवंतराव सावन्त अभियांत्रिकी महाविद्यालय हडपसर (उपज), स. प. महाविद्यालय (उबरमेन्सचं), राजश्री शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय (फिर मिलेंगे) आणि फर्ग्युसन कॉलेज (वगसम्राज्ञी) या महाविद्यालयांचा समावेश आहे. आता ४९ वा फिरोदिया करंडक पटकावण्यासाठी येत्या २५ व २६ फेब्रुवारीला होणाऱ्या अंतिम फेरीत या संघांमध्ये चुरस रंगेल.
११ ते १५ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या या स्पर्धेत एकूण तीस महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. सातारा रस्त्यावरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात प्राथमिक फेरी पार पडली. या फेरीसाठी आदित्य इंगळे, गिरीश दातार, अनमोल भावे, प्राजक्ता अत्रे आणि देवेंद्र गायकवाड यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.