
तेवीस लाखांचे कोकेन जप्त
पुणे, ता. १६ : सराईत अमली पदार्थ तस्कर जेम्स डार्लिग्टन लायमो (टांझानिया) याला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अखेर अटक केली आहे. गेल्या अडीच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा जेम्स नाकाबंदीत पोलिसांच्या हाती लागला आहे.
हांडेवाडी परिसरातील जाधवनगर येथून जेम्सला पकडण्यात आले. त्याच्याकडून २३ लाख २६ हजार रुपयांचे १६६ ग्रॅम ३०० मिलीग्रॅम कोकेन व तीन मोबाईल आणि रोकड असा माल जप्त करण्यात आला आहे. जेम्स याच्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात २०२० मध्ये अमली पदार्थ तस्करीचा गुन्हा दाखल होता. त्यात त्याच्या मित्राला अटक केली होती. तेव्हापासून जेम्स फरार होता. याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सांगितले, जेम्स हा सराईत अमली तस्कर आहे. तो दोन महिन्यांपासून जाधवनगर हांडेवाडी येथे राहत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोम्बिंग ऑपरेशनच्यावेळी सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, कर्मचारी ज्ञानेश्वर घोरपडे, सुजित वाडेकर यांनी त्याला पकडले.