मिळकत परस्पर विकून १४.५० कोटींची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिळकत परस्पर विकून १४.५० कोटींची फसवणूक
मिळकत परस्पर विकून १४.५० कोटींची फसवणूक

मिळकत परस्पर विकून १४.५० कोटींची फसवणूक

sakal_logo
By

पुणे, ता. २६ : करारनाम्याचे उल्लंघन करून आणि मालकी हक्काची मिळकत परस्पर विकून १४ कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून गॅलॅक्सी कन्स्ट्रक्शन ॲण्ड कॉन्ट्रक्टर्सच्या दोन संचालकांविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यातील एकाला अटक झाली आहे. तळमजला आणि दोन मजल्यांच्या बांधकामाला परवानगी असताना, सात मजल्यांचा बांधकाम नकाशा तयार करून, तो महापालिकेने मंजूर केल्याचे भासवून त्यावरही २४ कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक विजय जगदीशचंद्र अगरवाल यांनी चतु:शृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार गॅलेक्सी कन्स्ट्रक्शन ॲण्ड कॉन्ट्रक्टर्सचे संचालक अशोक शिवनारायण थेपडे आणि अमित अशोक थेपडे (दोघेही रा. डी. २२, मंत्री किशोर पार्क, भोसलेनगर) यांच्याविरुद्ध बनावट कागदपत्रे तयार करणे, करारनाम्याचे उल्लंघन करून फसवणूक करणे आदी कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे. अमित थेपडेला अटक झाली असून त्याला सोमवारपर्यंत (ता. २७) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. हा प्रकार ऑगस्ट २००६ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अगरवाल यांची सिद्धिविनायक दुर्गादेवी डेव्हलपर्स कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी आहे. कंपनीने २००० मध्ये पाषाण येथील २६ गुंठे जमीन करारनाम्याने विकसनासाठी घेतली होती. त्यांनी ही जमीन २००६ मध्ये गॅलेक्सी कन्स्ट्रक्शन ॲण्ड कॉन्ट्रक्टरच्या संचालकांना भागीदारीत कराराने विकसनासाठी दिली. करारानुसार बांधकाम गहाण ठेवणे किंवा त्यावर बॅंकेतून कर्ज काढण्याची परवानगी दिलेली नव्हती. तसेच, बांधकाम नकाशे मंजूर झाल्यापासून १५ महिन्यांत काम पूर्ण करून देण्याचे ठरले होते. परंतु करारनाम्यात ठरल्यानुसार बांधकाम पूर्ण करून दिले नाही. त्यामुळे मुदतवाढ दिली होती. तसेच, कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीस ताबा देण्याचे अधिकार कंपनीला दिले नव्हते. मात्र, गॅलेक्सी कन्स्ट्रक्शन कंपनीला दोन मजल्यांची परवानगी असताना, सात मजली इमारतीचा बनावट बांधकाम नकाशा तयार केल्याचा आरोप आहे. त्याला महापालिकेने मंजुरी दिली आहे, असे भासवून पिंपरी चिंचवडमधील एका बॅंकेकडून त्यावर दोन टप्प्यांत २४ कोटींचे कर्ज घेतल्याचे उघडकीस आले आहे. त्यात एका जामीनदाराच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या आहेत, असेही आरोपात म्हटले आहे.
अन्य एका बँकेकडूनही सुमारे ६ कोटी ५० लाखांचे कर्ज घेतले आहे. अगरवाल यांच्या हिश्श्यातील चार कोटी रुपये किमतीचे दुकान आणि साडेदहा कोटी रुपये मूल्य असलेले कार्यालय, थेपडे यांनी परस्पर विकले. त्यामुळे १४ कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक मनीष तुले करीत आहे.