
शेतकरी, युवकांच्या प्रश्नावर युवक काँग्रेसतर्फे आंदोलन
पुणे, ता. १० : युवकांमधील बेरोजगारी, विद्यार्थ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने सोमवारी (ता. २०) रोजी विधिमंडळाला घेराव घालण्यात येणार आहे. राज्यभरातून २० ते २५ हजार युवक या आंदोलनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मितेंद्र सिंग व प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेत दिली.
प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रशांत ओगले, महिला उपाध्यक्षा सोनलक्ष्मी घाग, प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे, अक्षय जैन, प्रदेश प्रवक्ते दीपक राठोड, पुणे शहराध्यक्ष राहुल शिरसाठ आदी उपस्थित होते.
मितेंद्र सिंग म्हणाले, ‘‘युवक आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठीच्या या लढाईत राज्याच्या प्रत्येक तालुक्यातून तरुण सहभागी होणार आहेत. तरुणांना ‘प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये सीमित करण्याच्या मोदी-अदानी युतीच्या षडयंत्राला जाब विचारण्यासाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.’’