टेकड्यांचे वस्त्रहरण!

टेकड्यांचे वस्त्रहरण!

पुणे, ता. १० : ‘‘पूर्वी बिबवेवाडीच्या परिसरात डोळ्यात घालायला माणूस नव्हतं आणि आता सगळीच माणसं उगवल्यागत झालंय. दोघीजणी असल्याशिवाय बिबवेवाडीच्या टेकडाजवळच्या वावरात जायची हिंमत होत नव्हती, इतका माणसांचा दुष्काळ होता. पण, आता तो निसर्ग गेला. त्याजागी घरे आणि ‘बिल्डिंग’ झाल्या. त्यामुळे सगळीच माणसंच माणसं दिसतात...’’ वयाच्या १२ वर्षी लग्न करून बिबवेवाडीत रहायला आलेल्या पार्वती बिबवे बोलत होत्या...हे अनुभवाचे बोल ऐकले व आताची परिस्थिती प्रत्यक्ष बघितली तर टेकड्यांचे कसे वस्त्रहरणा झालेले आहे, हे स्पष्ट होते.
बिबवेवाडी टेकडीबद्दल येथे राहणाऱ्या जुन्या जाणत्या लोकांशी ‘सकाळ’ने संवाद साधला. त्या वेळी पार्वतीबाईंनी बोलत-बोलता जुन्या बिबवेवाडीचे चित्र डोळ्यासमोर साकारले. प्रत्येक शब्दा-शब्दातून त्या जुन्या आठवणीत रमल्याचे स्पष्ट जाणवत होतं. ‘‘आता बदल काय सगळीकडेच झालाय,’’ या वाक्यानंतर त्यांनी संवादाला सुरवात केली. त्या म्हणाल्या, ‘‘पूर्वी या भागात भरपूर झाडं होती. आंबा, चिंच, वड, पिंपळ यांचे डेरेदार झाडांनी हा परिसर भरलेला होता. टेकडीच्या जवळ वावरं होती. त्यात भुईमूग, वाटाणा अशी कडधान्य होती. त्यानंतर ज्वारी, हरभरा ही पिके घेतली जात. आता त्याच भागात माणसं पेरल्यागत परिस्थिती झालीय. हा बदल गेल्या पंधरा-वीस वर्षांमध्ये जास्त झाला. याच भागात माणसं जास्त दिसत नव्हती. अक्षरशः डोळ्यात घालायला माणूस नव्हता. वावरात एकट्याला जायला भीती वाटावी इतकी शांतता होती. हा निसर्ग आता गेला. त्या जागी उभ्या राहिल्या उंच बिल्डिंग. तेथे रहायला आली माणसं. जिथे माणूस दिसत नव्हता आणि तिथं फक्त माणसं उगवल्यागत परिस्थिती झालीय.”

निसर्गरम्य टेकडी फुटली
पुणे शहरातील निसर्गरम्य टेकडी शहरीकरणाच्या रेट्यात फुटली. तिचे काही अवशेष आता आपल्याला दिसतात, हेच खुद्द पुणे महापालिकेने जुन्या हद्दीतील टेकड्या आणि डोंगर उताराबाबत प्रसिद्ध केलेल्या अहवालात अधोरेखित केले आहे. या अहवालात बिबवेवाडी टेकडीची झालेली वाताहत शास्त्रीय पद्धतीने मांडण्यात आल्याचे दिसते. सर्वेनंबर ५७७ आणि त्याच्या परिसरात टेकडीवर उभे छेद घेतले आहेत. तसेच, अग्नेय भागातही मोठ्या प्रमाणात विकास कामे करताना टेकडी पोखरली गेल्याचे या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे. गंगाधाम आणि कोंढवा यांना जोडणारा रस्ता याच भागातून गेला आहे. त्यासाठी या टेकडीचा बराचसा भाग फोडण्यात आला. विकासकामांबरोबरच इमारतींच्या बांधकामांसाठी टेकडीला सुरुंग लावण्यात आले. लोकांनी आपली घरे बांधण्यासाठी या टेकडीचा आधार घेतला. त्यामुळे निसर्गरम्य असलेली टेकडी उद्‍ध्वस्त झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.

ऐतिहासिक महत्त्व
१) मराठ्यांचा इतिहास
पुण्याचा परिसरातील टेकड्या या शहरासाठी संरक्षक भिंत असल्याप्रमाणे होत्या. त्यामुळे मराठ्यांच्या इतिहासात लष्करातील मोक्याचे स्थान म्हणून बिबवेवाडी टेकडीकडे पाहिले जात होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यावर आक्रमणासाठी येणाऱ्या शत्रूच्या प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी या टेकडीचा वापर केल्याची नोंद इतिहासात आहे. तसेच, शिवाजी महाराजांनंतर मराठा सरदारांनी मोघल साम्राज्याविरुद्ध गनिमी कावा करत लढाई सुरु ठेवली. त्यात या टेकडीचा मोलाचा वाटा होता.
२) पेशवेकालीन महत्त्व
या टेकडीच्या परिसरात दगडखाणी होत्या. त्यातूनच शनिवाडा बांधण्यासाठी दगड वापरले, अशा काही नोंद आढळतात. याची पडताळणी करण्यासाठी इतिहासाचे अभ्यासक मंदार लवाटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘शनिवार वाडा बांधण्यासाठी दगड नेमके कुठून आणले याची नोंद इतिहासात नाही. त्यामुळे या टेकडीवरून ते आणले या बाबतचा पुरवा अद्यापपर्यंत मिळालेला नाही.’’
३) इंग्रजांची राजवट
इंग्रजांनी १९व्या शतकात पुणे आणि बिबवेवाडीची टेकडी ताब्यात घेतली. त्यांनी या टेकडीचा वापर लष्करी तळ म्हणून केला. त्यांनी त्यावर बरॅक आणि लष्करी ठाणी उभारली.
४) स्वातंत्र्योत्तर इतिहास
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही टेकडीचा काही भाग लष्कराच्या ताब्यात आला. अनेक वर्ष हे प्रतिबंधित क्षेत्र राहिले. पण, नंतर काही वर्षांनी यातील काही भाग लोकांसाठी खुला केला.

अस्तित्व धोक्यात
- शहरीकरण आणि विकास : शहरीकरणाच्या रेट्याचा पुण्याचा विस्तार होत गेला. त्यात रेट्यामुळे बिबवेवाडी टेकडी आणि त्याचा परिसरावर ताण आला. तेथे इमारती उभ्या राहिल्या आणि तेथील नैसर्गिक अधिवास नष्ट झाले.
- जंगलतोड : इमारती बांधण्यासाठी या टेकडीवरील बेसुमार जंगलतोड करण्यात आली. या जंगल सरपटणारे प्राणी, हिंस्र श्वापद आणि सुगरणीसारख्या पक्षांचे घर होती. ते जंगल नष्ट झाल्याने हे प्राणी, पक्षी या भागातून नामशेष झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com