Narendra Dabholkar Murder Case hamid dabholkar reaction govind pansare gauri lankesh murder
Narendra Dabholkar Murder Case hamid dabholkar reaction govind pansare gauri lankesh murderesakal

Narendra Dabholkar Murder Case: "तर कदाचित पानसरे, गौरी लंकेश यांची हत्या टळली असती", निकालानंतर हमीद दाभोलकर यांची प्रतिक्रिया

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना येथील विशेष न्यायालयाने शुक्रवारी (ता. १०) जन्मठेप तसेच प्रत्येकी पाच लाख रुपये दंडाची शिक्षाही सुनावली.

 महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना येथील विशेष न्यायालयाने शुक्रवारी (ता. १०) जन्मठेप तसेच प्रत्येकी पाच लाख रुपये दंडाची शिक्षाही सुनावली. सबळ पुराव्याअभावी आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, ॲड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटल्यात साक्षीदारांनी न्यायालयात पूर्वीच्या दोन आरोपींबाबत आणि नंतर नव्याने दोन आरोपींबाबत वेगवेगळ्या साक्ष दिल्या आहेत. त्यामुळे साक्षीदारांची साक्ष विश्वासार्ह नाही, असे आमचे म्हणणे न्यायालयात मांडले. परंतु न्यायालयाने साक्षीदारांचे म्हणणे ग्राह्य धरून हा निकाल दिला असावा. आम्ही याबाबत उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. तसेच घटनास्थळी नाकाबंदीसाठी तैनात असलेल्या तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक आणि साक्षीदाराने एकमेकांना बघितलेले नाही. या बाबी आम्ही उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ. निर्दोष सुटलेल्या आरोपींबाबत केवळ संशय व्यक्त केला गेला होता. त्यामुळे केवळ संशयावरून आरोपींना शिक्षा होत नाही, तर साक्षी पुरावेही महत्त्वाचे आहेत. तपास यंत्रणा भरकटली, ही शोकांतिका आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे खटला सुरू होता.
- ॲड. प्रकाश साळशिंगीकर, बचाव पक्षाचे वकील

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा झाली. परंतु सूत्रधारांना शिक्षा झालेली नाही. त्यामुळे ही न्यायाची लढाई आम्ही निर्धाराने पुढे सुरूच ठेवू. या खटल्याचा निकाल वेळेत आला असता तर कदाचित कॉम्रेड गोविंद पानसरे, गौरी लंकेश यांची हत्या टळली असती. परंतु उशिरा का होईना न्याय मर्यादित अर्थाने झाला, अशी आमची भावना आहे. याबाबत आम्ही उच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत. डॉ. दाभोलकर यांची हत्या म्हणजे वैयक्तिक वाद नाही. हा डॉ. दाभोलकर यांचा विचार संपवण्याचा प्रयत्न होता. परंतु त्यांचा विचार समाजात पोचविण्यासाठी निर्धाराने ही लढाई सुरू ठेवली जाईल. एखादा विचार संपवण्यासाठी खून करणे हे त्याचे उत्तर नाही. संविधानिक पद्धतीने अभिव्यक्त होणाऱ्या व्यक्तींना कायद्याने संरक्षण मिळाले पाहिजे.
- हमीद दाभोलकर

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या हा व्यापक कटाचा भाग होता. केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) अद्याप सूत्रधारापर्यंत पोचलेले नाहीत. त्यांचा छडा लावण्यासाठी इतर तपास यंत्रणाही असाव्यात. कोणी बळाचा वापर करून संपविण्याचा प्रयत्न झाल्यास ‘आम्ही सर्व दाभोलकर’ या भावनेने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून कार्यरत राहू. अंनिसच्या सहकाऱ्यांनी, कुटुंबीयांनी आरोपींना शिक्षा व्हावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. लोकशाहीत न्यायासाठी दीर्घकाळ लढाई लढावी लागली.
- मुक्ता दाभोलकर

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा कट ज्यांनी रचला ते सूत्रधार अद्याप समोर आलेले नाहीत.‌ लोकशाही व्यवस्थेत न्याय प्रक्रियेवर विश्वास ठेवून इतके वर्षे घालवली. डॉ. दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील तीन आरोपी सारखेच आहेत. कॉम्रेड पानसरे यांच्या खून खटल्यातील १२ आरोपींना अद्याप शिक्षा झालेली नाही. त्या सर्व आरोपींना शिक्षा होण्यासाठी ‘एटीएस’ने प्रयत्न करावेत.
- मेधा पानसरे
-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com