तो आला... तो गायला... अन् त्याने जिंकलं!

तो आला... तो गायला... अन् त्याने जिंकलं!

पुणे, ता. ११ : सळसळत्या उत्साहासह जमलेले हजारो रसिक, गर्दीने फुललेले काकडे फार्म्स असा सुरेख माहोल जमला असताना ऐनवेळी पावसाने हजेरी लावली. मात्र पाऊस थांबताचत ‘तो’ मंचावर आला... पाहता पाहता त्याने आपल्या आवाजाने साऱ्यांना बेभान केले आणि दोन तास स्वरधारेत चिंब भिजवले. प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी रंगवलेल्या अविस्मरणीय मैफिलीनंतर ‘तो आला... तो गायला... अन् त्याने जिंकलं!,’ अशीच भावना सगळ्या रसिकांच्या मनात उमटली.
सकाळ माध्यम समूहातर्फे ‘सोनू निगम नाईट’ या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी पाच वाजेपासून उत्साही रसिक कार्यक्रमस्थळी येण्यास सुरुवात झाली होती. मात्र मैफील सुरू होण्याच्या वेळीच पावसाला सुरुवात झाली. मात्र तरीही रसिक जागचे हलले नाहीत. थोड्यावेळात पाऊस थांबताच सोनू निगम यांचे मंचावर आगमन झाले आणि दहा हजार रसिकांनी एकच जल्लोष केला. सोनू निगम यांनीदेखील पावसात थांबून राहिलेल्या रसिकांचे आभार मानत मैफलीला सुरुवात केली.‘कहानी’ या पहिल्या गाण्यापासूनच त्यांनी पकड घेतली.
‘दीवाना तेरा’, ‘हस मत पगली प्यार हो जाएगा’, ‘मैं की करा’, ‘देखा तुम को जब सें’, ‘शुकरान अल्लाह’ अशी एकसे एक बहारदार गाणी सादर करत सोनू निगम यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. ‘कभी अलविदा ना कहना’, ‘सूरज हुआ मद्धम’, ‘दिल डूबा’, ‘ये दिल दीवाना’, ‘फ़ना’, ‘हम है राही प्यार के’, ‘जीने के हैं चार दिन’, ‘ऑल इज वेल’ यासारखी लोकप्रिय गाणी सादर करताना त्यांनी रसिकांनाही आपल्यासह गायला लावले. रसिकांनीही त्यांना तितक्याच उत्साहाने साथ दिली.

अजरामर गाण्यांनी सांगता
‘बिजुरियाँ’, ‘तुमसे मिल के दिल का ये जो हाल’, ‘आज की रात होना है क्या’ या गाण्यांवर उपस्थित सगळ्यांनी ताल धरला. अखेरच्या टप्प्यात तर उपस्थितांमधील प्रत्येक व्यक्ती उभी राहून मैफलीचा आस्वाद घेत होती. ‘अभी मुझ में कहीं’ आणि ‘कल हो ना हो’ या अजरामर गाण्यांनी सोनू निगम यांनी या सुंदर मैफलीची सांगता केली.

कोहिनूर ग्रुप (कृष्णकुमार गोयल एंटरप्राइज) हे या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक होते. ॲबिज किचन हे फूड पार्टनर, ‘सूर्यकांत काकडे अँड असोसिएट्स’ हे व्हेन्यू पार्टनर आणि रेडिओ सिटी हे रेडिओ पार्टनर होते. ‘ॲमनोरा पार्क टाऊन’ यांचे सहकार्य या मैफलीला लाभले होते. ‘लाइट बल्ब’ आणि ‘शुभम आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग’ हे आउटडोअर पार्टनर होते.

सोनू निगम यांच्या उत्साहाने सारेच अवाक
या मैफलीत सोनू निगम यांनी सलग अडीच तास न थांबता गाणी सादर केली. प्रत्येक गाण्यात तोच उत्साह आणि तोच जोश त्यांनी कायम ठेवला होता. अनेक गाण्यांवर रसिकांसह त्यांनीही ताल धरला आणि नृत्यही केले. त्यांची ही अफाट ऊर्जा पाहून उपस्थित सारेच अवाक झाले आणि टाळ्यांच्या गजरात त्यांनी या प्रतिभावान कलाकाराला दाद दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com