

पुणे, ता. २७ : आगामी गणेशोत्सव आणि ईद-ए- मिलादच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा बैठक घेतली.
या बैठकीत विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद सण शांततेत पार पाडण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा घेतला. यापूर्वी गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्याबाबत योग्य उपाययोजना कराव्यात. गणेश मंडळांच्या बैठका आणि ईद-ए-मिलादच्या अनुषंगाने शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात यावी. संवेदनशील ठिकाणी रूट मार्च करून जातीय तणाव वाढणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. महिलाविषयक गुन्ह्यांना प्रतिबंध करून शाळा, महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन, अनुचित घटनांवर तत्काळ कायदेशीर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान, गणेशोत्सव आणि ईद-ए- मिलाद सण साजरे होत असताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिस दल सज्ज आहे. जिल्हा विशेष शाखा, स्थानिक गुन्हे शाखा, बिनतारी संदेश विभाग या शाखांकडून करण्यात आलेल्या नियोजनाचा आराखडा, गुन्हे आढावा, तसेच आगामी विधानसभा निवडणुकीबाबत पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी माहिती दिली. बैठकीस अतिरिक्त पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांच्यासह पुणे ग्रामीण पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ग्रामीणच्या पोलिसांचे कौतुक
आगामी विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया पारदर्शक, भयमुक्त व निष्पक्षपणे पार पाडणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे यासाठी मतदान केंद्रांबाबत आढावा घेण्यात आला. संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवून सोशल मीडियावर लक्ष ठेवून अनुचित संदेश प्रसारित करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी. जिल्ह्यातील दरोड्याच्या गुन्ह्यांना आळा बसल्याने त्यांनी पुणे ग्रामीण जिल्हा पोलिस दलाचे कौतुक केले. इतर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवून जास्तीत जास्त गुन्ह्यांचा उलगडा करण्याच्या सूचना दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.