मराठवाड्याला ऊर्जितावस्थेत आणा
पुणे, ता. ९ : ‘‘सातवाहन ते यादव घराणे असा प्रदीर्घकाळ मराठवाडा संपन्न होता. मात्र, येथील माणसांची मागे राहण्याची वृत्ती नडली. ही वृत्ती बदलून विजिगीषू वृत्तीने संघर्ष करत मराठवाड्याला पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याचे आव्हान स्वीकारा,’’ असे आवाहन मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी केले.
मराठवाडा सेवक प्रतिष्ठानतर्फे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय ‘मराठवाडा रत्न पुरस्कार’ वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी डॉ. देगलूरकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय विमुक्त भटक्या आणि अर्ध भटक्या जमाती विकास मंडळाचे अध्यक्ष भिकुजी दादा इदाते यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. याप्रसंगी मराठवाडा मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव, मराठवाडा सेवकसंघाचे अध्यक्ष दिनकर चौधरी, उपाध्यक्ष दिनेश सास्तुतकर, सचिव गणेश चौधरी, विवेक जाधव, दत्तात्रेय शिंदे उपस्थित होते.
या वेळी खंडेराव कुलकर्णी (शिक्षकरत्न पुरस्कार), रमेश अंबरखाने (उद्योगरत्न पुरस्कार), प्रदीप नणंदकर (आदर्श पत्रकारिता पुरस्कार), रमाकांत जोशी (आरोग्यरत्न पुरस्कार), धनंजय गुडसुरकर (साहित्यरत्न पुरस्कार), सुधाकर जाधवर (शिक्षणरत्न पुरस्कार), मंगेश बोरगावकर (संगीतरत्न पुरस्कार), दिनेश वैद्य (औद्योगिक सुरक्षा पुरस्कार), गौतम बनसोडे (उद्योगरत्न पुरस्कार), संदीप पंचवाटकर (कलारत्न पुरस्कार), परमेश्वर पाटील (उद्योगरत्न पुरस्कार) यांचा ‘मराठवाडा रत्न’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. यानिमित्त काढलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.
इदाते म्हणाले, ‘‘मराठवाड्यात प्रचंड गुणवत्ता आहे. महान परंपरा आहे. गरज आहे ती, या समृद्ध परंपरा नव्या पिढीशी जोडण्याची. देशाच्या जडणघडणीत वंचितांचे फार मोठे योगदान आहे. आचार, विचार, उच्चार आणि संस्कार यांद्वारे संस्कृती प्रकट करण्याची प्रक्रिया पुन्हा जागी करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीचे पाथेय मराठवाड्यात आहे.’’
भाऊसाहेब जाधव म्हणाले, ‘‘मागील पिढ्यांच्या समर्पण आणि त्यागावर आजचा काळ उभा असतो. आजचा मागासलेला मराठवाडा पुन्हा विकसित करण्यासाठी सहवेदना गरजेची आहे.’’ दिनकर चौधरी यांनी प्रास्ताविक केले. शिल्पा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. सास्तुतकर यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. रमेश सूर्यवंशी यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

