सकाळ स्वास्थ्यम्: उत्तम आरोग्यासाठी पुरेशी झोप आवश्यक - तज्ञांचा सल्ला
अन्न, पाणी, प्राणवायूप्रमाणेच झोपही आवश्यक
पुणे, ता. ७ : झोपेत समतोल असावा. झोप त्रासदायक, तर अतिझोप हानिकारक ठरते. अन्न, पाणी व प्राणवायूच्या जोडीला पुरेशी झोपही आवश्यक असते, असे प्रतिपादन बालनिद्रा सल्लागार अँजेलिना गुप्ता आणि मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. सुजित जगताप यांनी व्यक्त केले. दुपारच्या सत्रात निद्रा - विश्रांतीचे महत्त्व - शांत निद्रा आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.
----
कुटुंबाच्या आरोग्यासाठी मुलांची झोप महत्त्वाची
पालकांचे आणि परिणामी संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी नवजात शिशूप्रमाणेच किशोरवयीन मुलांसाठीही झोप आवश्यक असते, असे अँजेलिना गुप्ता यांनी केले. त्यांनी सांगितले की, मी स्वत: आई होणार होते तेव्हा नवजात शिशू व लहान मुलांच्या झोपेशी संबंधित विविध घटकांचा जास्त अभ्यास सुरू केला. माझी वैद्यकीय पार्श्वभूमी उपयुक्त ठरली. याच प्रेरणेतून babysleep.in ची स्थापना झाली. बालनिद्रा सल्लागार म्हणून या क्षेत्रात सात वर्षांहून जास्त काळ काम करताना खूप चांगले अनुभव आले. त्यामुळे आजवर आठ हजारांहून जास्त कुटुंबांच्या निद्राविषयक समस्या दूर करण्यात यश आले.
गुप्ता प्रामुख्याने एका महिन्यापासून १४ वर्षे वयाच्या मुला-मुलींसाठी काम करतात. त्यांच्या सत्राची मुद्देसूद मांडणी
कुणी किती झोपावे
१० ते १३ तास ः लहान मुले
८ ते १० तास ः किशोरवयीन
---
झोपेच्या समस्येची मुख्य कारणे
- चंचलपणा
- बुद्धीचा खुंटलेला विकास
- शहरी जीवनातील वाढता कोलाहल, रहदारीचे आवाज, धावपळ
---
हे करा
- दिनचर्या ठरवा
- झोपेसाठी पुरेसा वेळ द्या व ती पाळा
- झोपण्यापूर्वी ‘स्क्रीन टाइम’ मर्यादित ठेवा
- मुलांच्या शरीराचा जैविक घड्याळ सुरळीत चालावे म्हणून झोपण्याआधी शांत वातावरण तयार करा
- टीव्ही, मोबाईल किंवा इतर गॅजेट्सचा वापर कमी करा, त्यांचा आवाज मोठा ठेवू नका
- झोपायच्या अगोदर पचण्यास जड पदार्थ, गोड किंवा कॅफिननयुक्त पदार्थ खाणे टाळा
- झोपेचे ठिकाण आरामदायक आणि शांत असावे
----
मुलांच्या गाढ झोपेचे फायदे
- निरोगी राहणे
- मेंदूचे कार्य सुरळीत पार पडते
- स्मरणशक्ती वाढते
- आकलनशक्ती सुधारते.
- रोगप्रतिकारशक्ती वाढते
- एकाग्रता न होणे, नैराश्य, चिडचिड, पोटाचे विकार अशा समस्या पळून जातात
- पालकांनाही चांगली झोप लागते
----
अनियमित झोपेमुळे आजारांचा धोका : डॉ. जगताप
डॉ. सुजित जगताप म्हणाले, ‘‘घोरणे ही आपल्यापैकी अनेकांना विकार किंवा समस्या वाटत नसली तरी तो आजार आहे, जो शरीरासाठी घातक आहे. वजन वाढू लागल्यावर घोरण्याचे प्रमाण वाढतं. घोरणाऱ्या व्यक्तीच्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा नीट होत नाही. त्यामुळे दिवसभर थकवा जाणवतो, चिडचिड होते. शंभरातील ५० टक्के लोकांमध्ये ही समस्या जाणवते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होते. बॉडी मास इन्डेक्स हा सामान्यतः २५ असतो. तो २७ पेक्षा जास्त झाल्यावर वजन वाढणे, घोरणे अशा समस्या वाढतात. मेंदू आणि झोप यांचा थेट संबंध आहे. अशा अनेक समस्या आहेत की, ज्या केवळ झोपेत जाणवतात. त्यामुळे अनेकांच्या ते वेळीच लक्षात येत नाही. काही जणांना झोपेतच ''फिट्स'' येतात. त्यामुळे हा आजार आहे हे लवकर कळत नाही. काही रुग्णांना कंपवात, झोपेत भास होणे, हालचाली होणे, चालणे अशा समस्या जाणवतात. ''नार्कोलेप्सी'', म्हणजे बसल्या-बसल्या झोपणे किंवा कोणतीही क्रिया करताना एकदम डुलकी लागणे हादेखील एक आजारच आहे. हे सर्व आजार आपल्या आजूबाजूला अनेकांना असतात.
बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांची पुरेशी झोप होत नाही. मात्र, पुरेशी झोप होणे अत्यंत आवश्यक आहे. ती न झाल्यास रक्तदाब, मधुमेह, तणाव, नैराश्य, डोकेदुखी, अपचन, पक्षाघात असे अनेक आजार होऊ शकतात. मेंदूची शक्ती कमी होऊन त्याचा परिणाम इतर अवयवांवरही होऊ शकतो. जीवनशैलीतील, आहारातील बदल आणि औषधोपचाराद्वारे ही समस्या दूर करता येते. अशा रुग्णांनी सर्वप्रथम वजन कमी करण्याचा प्रयत्न करावा. तसेच अशा रुग्णांना एक मास्क लावता येतो. त्याला ''सी-कॅप'' म्हणतात. त्यामुळे श्वासनलिका थोडी अधिक मोकळी होते. श्वासोच्छ्वास चांगला होतो. घोरण्याचे प्रमाण कमी होते आणि इतरही समस्या दूर होतात. तसेच उत्तम आरोग्य जीवन जगण्यासाठी पुरेशी झोप घ्या. रात्री दहा ते सकाळी सहा ही झोपेसाठी योग्य वेळ आहे.
-------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

