त्रिवेणी कलासंगमाने रंगला ‘वसंतोत्सवा’चा दुसरा दिवस

त्रिवेणी कलासंगमाने रंगला ‘वसंतोत्सवा’चा दुसरा दिवस

Published on

पुणे, ता. १८ : रंजनी आणि गायत्री या बहिणींचे कर्नाटकी शैलीतील गायन, मेवाती घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. संजीव अभ्यंकर यांचे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायन आणि उस्ताद सुजात खाँ यांनी गायकी अंगाने केलेले सतारवादन अशा त्रिवेणी कलासंगमाने वसंतोत्सवाचा दुसरा दिवस रंगला.
वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानतर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रंजनी-गायत्री यांनी ‘राग कलावती’ने प्रारंभ केला. यात त्यांनी आदितालामध्ये एक रचना सादर केली. त्यानंतर त्यांनी ‘राग रंजनी’ प्रस्तुत करताना सद्गुरु त्यागराज स्वामी यांच्या समाधी दिनानिमित्त रूपक तालातील एक रचना प्रस्तुत केली. संत जनाबाई यांचा ‘विठोबा चला मंदिरात’ हा अभंग सादर करत त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला. या दोघींना व्हायोलिनवर रामकृष्णन, मृदंगमवर दिल्ली साईराम, तर घट्टम्मवर कृष्णा यांनी साथसंगत केली.
दुसऱ्या सत्रात पं. संजीव अभ्यंकर यांचे गायन झाले. त्यांनी ‘राग बागेश्री’मध्ये बडा ख्याल सादर केला. ‘जा रे बलमा तोसे नाही बोलू’ ही मेवाती घराण्यातील बंदिशही त्यांनी सादर केली. त्यानंतर ‘राग जोगकंस’मध्ये ‘इतनी बिनती सुनो मोरी पिया’ ही बंदिश प्रस्तुत केली. तराणा सादर करत त्यांनी आपल्या सादरीकरणाला विराम दिला. त्यांना तबल्यावर अजिंक्य जोशी, संवादिनीवर अभिषेक शिनकर, पखवाजवर प्रथमेश तारळकर, तानपुऱ्यावर मुक्ता जोशी व अबोली देशपांडे, तालवाद्यांवर उद्धव कुंभार यांनी साथसंगत केली. साईप्रसाद पांचाळ आणि धनंजय म्हसकर यांनी स्वरसाथ केली.
अखेरच्या सत्रात इटावा घराण्याचे सतारवादक उस्ताद सुजात खाँ यांचे सतारवादन झाले. त्यांनी राग वाचस्पती सादर केला. आलापी, जोड, झाला या क्रमाने त्यांनी वादन केले. त्यानंतर ‘डगर चलत मोसे’ ही बंदिश प्रस्तुत केली. त्यांना तबल्यावर मुकेश जाधव आणि अमित चोभे यांनी साथसंगत केली. स्नेहल दामले आणि विघ्नेश जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com