

अक्षता पवार : सकाळ वृत्तसेवा
सिक्कीम, ता. ४ : भारतात प्लास्टिक कचऱ्याच्या निर्मितीत वाढ झाल्याची बाब नुकतीच एका अहवालातून समोर आली आहे. सर्वाधिक जास्त प्लास्टिकच्या कचऱ्याची निर्मिती करणाऱ्या राज्यांमध्ये सिक्कीमचादेखील समावेश असल्याचे त्यातून स्पष्ट झाले आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात भारतात प्लास्टिक कचऱ्याच्या निर्मितीची उच्चांकी नोंदली गेली आहे.
पर्यावरणाशी निगडित विविध समस्या, त्यावरील उपायांवर अभ्यास करणाऱ्या सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्न्मेंट (सीएसई) या संस्थेने नुकतेच भारतीय पर्यावरणाची दशा (एसओई) हा अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यानुसार आर्थिक वर्ष २०१८-१९, २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ आणि २०२२-२३ दरम्यान भारतात निर्माण झालेल्या प्लास्टिक कचऱ्याची स्थिती मांडण्यात आली आहे. काही एकेरी वापराच्या (सिंगल यूज) प्लॅस्टिकवर बंदी असूनदेखील, ज्यामध्ये २०२२-२३ या वर्षात भारतात सुमारे ४१ लाख टन प्लास्टिक कचरा निर्माण झाला आहे. दरम्यान, यामध्ये देशातील १५ राज्ये व केंद्रशासित प्रदेश असे आहेत, जिथे २०१८ ते २०२३ या पाच वर्षांच्या कालावधीत ५० टक्क्यांहून अधिक प्लास्टिक कचऱ्याची निर्मिती झाल्याचे या अहवालातील आकडेवारीतून समजते.
महाराष्ट्रात प्लास्टिक कचऱ्यात घट
अहवालातील आकडेवारीनुसार २०१८ ते २०२३ या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्यात चांगलीच घट झाली आहे. दरम्यान, देशातील प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या (पीडब्ल्यूपी) सर्वाधिक युनिट्स असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात सुमारे २७० नोंदणीकृत पीडब्ल्यूपी आहेत. कचरा प्रक्रियेशी निगडित यांत्रिक पुनर्वापराचे युनिट्सची संख्या ४६४ आहे.
ठळक बाबी...
- २०२२-२३ मध्ये भारतातील प्लास्टिक कचरा निर्मिती ४१.४ लाख टनांच्या विक्रमी उच्चांकावर
- २०१८ ते २०२३ दरम्यान प्लास्टिक कचरा निर्मितीत भर घालणाऱ्या राज्यांमध्ये सर्वाधिक जास्त कचऱ्याची निर्मिती तमिळनाडूची
- या पाच वर्षांत प्लास्टिक कचऱ्याच्या निर्मितीत ५० टक्क्यांपर्यंतची वाढ असलेली आठ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचा समावेश
- १३ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये या पाच वर्षांमध्ये प्लास्टिक कचऱ्याच्या निर्मितीत घट
- देशात २४९२ नोंदणीकृत पीडब्ल्यूपी, तर यांत्रिकी पुनर्वापराचे सुमारे ३५०० युनिट्स
देशातील प्लास्टिक कचऱ्याची निर्मिती
वर्ष : प्लास्टिक कचऱ्याची निर्मिती (टनांमध्ये)
२०१८-१९ : ३३.६ लाख
२०१९-२० : ३३.७ लाख
२०२०-२१ : ४०.४ लाख
२०२१-२२ : ३८.३ लाख
२०२२-२३ : ४१.४ लाख
सर्वाधिक प्लास्टिक निर्माण करणारी राज्ये (२०२२-२३ मध्ये)
राज्ये : प्लास्टिक कचरा (टनांमध्ये)
तमिळनाडू : ७ लाख ८२ हजार ५६०
तेलंगण : ५ लाख २८ हजार ५२०
दिल्ली : ४ लाख ३ हजार ३४७
प्लास्टिक कचरा प्रक्रिया करणारे युनिट्स
राज्ये : नोंदणीकृत पीडब्ल्यूपी संख्या : यांत्रिकी पुनर्वापराचे युनिट्स
गुजरात : ६४३ : ८८४
दिल्ली : ४१८ : ४५१
महाराष्ट्र : २७५ : ४६४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.