कामगारांना मारहाण करणारा माजी नगरसेवक कोण?

कामगारांना मारहाण करणारा माजी नगरसेवक कोण?
Published on

पुणे, ता. १२ : मर्जीतील ठेकेदाराला सांडपाणी वाहिनी टाकण्याचे काम न मिळाल्याच्या रागातून माजी नगरसेवकाने ठेकेदाराच्या कामगारांना बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी सहकारनगर भागात घडली असली असून, ४८ तास उलटून गेले तरी मारहाण करणारे कोण आहेत हे महापालिकेला व पोलिसांना कळू न शकल्याने अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र यामुळे पुन्हा एकदा महापालिकेच्या कामातील राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
महापालिकेच्या मलनिःसारण विभागाकडून अरणेश्वर ते पद्मावती मंदिर यादरम्यान आंबिल ओढ्यातून १२०० मिमी व्यासाची सांडपाणी वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम आपल्या मर्जीतील ठेकेदाराला मिळावे, यासाठी माजी नगरसेवक व त्यांच्या साथीदारांनी प्रयत्न केले होते. पण त्यांना निविदेत रिंग करण्यात अपयश आले. गेल्या दोन आठवड्यांपासून हे काम बंद पडले होते.
गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा सांडपाणी वाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले. मंगळवारी (ता. ११) सकाळी काम सुरू असताना माजी नगरसेवकाने आणि चार-पाच सहकाऱ्यांनी तेथील मजुरांना, जेसीबी चालकाला बेदम मारहाण करून पळवून लावले. त्यामुळे काम बंद पडले. मलनिःसारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे. आज सकाळी ठेकेदाराचे कामगार तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले होते, पण त्यांनी माजी नगरसेवकाच्या दहशतीमुळे तक्रार दिलेला नाही.

कामाच्या ठिकाणी अभियंता अनुपस्थित
कोट्यवधी रुपयांचे काम सुरू असताना त्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी महापालिकेच्या अभियंत्याने तेथे उपस्थित राहणे आवश्यक होते. पण ही घटना घडली तेव्हा तेथे एकही अभियंता उपस्थित नव्हता. तसेच वरिष्ठांनी घटनास्थळी जाण्याबाबत व कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतरही दिवसभरात काय केले याची माहिती रात्री उशिरापर्यंत देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे महापालिकेचे अभियंतादेखील या प्रकरणात कुचराई करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या संदर्भात महापालिकेकडून तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. परंतु त्यात कोणाच्याही नावाचा उल्लेख नाही. जेसीबीचालकाला मारहाण करणाऱ्या व्यक्ती कोण आहेत, याबाबत चौकशी करण्यात येत आहे. त्यांची नावे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
- राहुल गौड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहकारनगर

सांडपाणी वाहिनी टाकण्याचे काम सुरू असताना तेथील कामगारांना काही लोकांनी मारहाण केली. हे लोक कोण आहेत, हे अद्याप समजलेले नाही. या संदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच उद्यापासून पुन्हा या ठिकाणी काम सुरू केले जाईल. आम्ही पोलिस संरक्षण मागितले आहे.
- दिनकर गोजारे, अधीक्षक अभियंता, मलनिःसारण विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com