

पुणे, ता. १८ : ‘‘भरपूर पैसे नाहीत म्हणून चांगला चित्रपट करू शकत नाही, असे म्हणणाऱ्या चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांनी फिरोदिया करंडक स्पर्धेतील विद्यार्थ्यांची नाटके पाहावीत. पैसे नसूनही केवळ उत्तम कथेच्या बळावर दर्जेदार सादरीकरण कसे करता येऊ शकते, याचे हे आदर्श उदाहरण आहे,’’ असे गौरवोद्गार प्रसिद्ध कवी, गीतकार, अभिनेते पियुष मिश्रा यांनी मंगळवारी काढले.
फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेच्या जल्लोषात झालेल्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी कायनेटिक समूहाचे उपाध्यक्ष अजिंक्य फिरोदिया, एचसीएल फाउंडेशनच्या संचालक डॉ. निधी पुंधीर, फिरोदिया करंडक स्पर्धेचे मुख्य संयोजक सूर्यकांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.
मिश्रा म्हणाले, ‘‘भारतातील अनेक रंगकर्मी देखील नाटकासाठी मोठे बजेट नाही, अशी ओरड करत असतात. ही ओरड कायम राहणार आहे. आपल्याकडे नाटकात खूप पैसे येणे, कधीच शक्य नाही. याउलट ज्यावेळी आपल्याकडे पैसा आला, त्यावेळी नाटकाची वाताहतच झाली, असा इतिहास आहे. पैसे असते तर आपण भ्रष्ट झालो असतो. ते नसल्यामुळे उलट स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द निर्माण झाली. स्पर्धेतील नाटकांमध्ये मला ती दिसून आली. ही स्पर्धा पाहायला यापूर्वीच का नाही आलो, याची मला खंत वाटते आहे. या स्पर्धेतील नाटकांचे प्रयोग मुंबईत व्हायला हवेत, अनुवादासाठी मी मदत करायला तयार आहे.’’
मिश्रा यांनी विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव ‘इक बगल में चांद होगा’ आणि ‘आरंभ है प्रचंड’ ही दोन लोकप्रिय गाणी सादर केली. विद्यार्थ्यांनीही टाळ्या, शिट्ट्यांच्या गजरात त्यांना दाद दिली.
यावेळी स्पर्धेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त ‘सुवर्णक्षण’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. महाविद्यालयीन काळात या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या आणि त्यानंतर कला क्षेत्रात यश मिळवलेल्या गायिका प्रियंका बर्वे आणि अभिनेते ओम भुतकर यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, द्वितीय क्रमांक पटकावलेल्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या एमआयटी ॲकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, आळंदी या तीन संघांसह विविध वैयक्तिक पारितोषिक विजेत्या स्पर्धकांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. सूर्यकांत कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.