कायदा काय सांगतो?
प्रश्न : माझे वय १६ वर्षे आहे. मला एक भाऊ १३ वर्षांचा तर एक बहीण १० वर्षांची असून आमच्या आईला कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. वडिलांचा स्वतःचा व्यवसाय असून त्यामध्ये त्यांना भरपूर नफा आहे, परंतु वडील आम्हाला जरुरी वस्तूंना देखील नकार देतात. आम्ही काय केले पाहिजे?
उत्तर : अल्पवयीन मुले आणि पत्नी ही पतीची जबाबदारी आहे आणि त्यांना अन्न, वस्त्र आणि निवारा यांसारख्या मूलभूत खर्चाची पूर्तता करावी लागते. तुम्ही कलम १२५ फौजदारी प्रक्रिया कोड अंतर्गत गुन्हा दाखल करू शकता. या प्रकरणात, अल्पवयीन मुले आणि पत्नीला भरणपोषणाची रक्कम मिळेल. ही रक्कम भरणे बंधनकारक आहे आणि ते अयशस्वी झाल्यास त्या व्यक्तीला तुरुंगात टाकले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला तुमच्या वडिलांचे उत्पन्न आणि त्यांची मालमत्ता तसेच तुमच्या आईचे उत्पन्न आणि मालमत्ता सिद्ध करणे आवश्यक आहे.
प्रश्न : मला तीन वर्षांची मुलगी आहे. माझ्या सासरच्या लोकांनी मला काही दिवस आईच्या घरी जायला सांगितले व माझ्या मुलाची शाळा असल्याने त्याला तेथेच ठेवून घेतले. आता चार महिने झाले. माझे पती मला माझ्या मुलाशी बोलू देत नाहीत किंवा त्याला भेटू देत नाहीत. मध्यस्थांमार्फत निरोप पाठवत आहेत की ते घटस्फोटाची नोटीस पाठवणार आहे.
उत्तर : तुम्ही ताबडतोब ताबा मिळवण्याचा दावा दाखल करू शकता. अल्पवयीन मुलांच्या बाबतीत, बहुधा न्यायालयाने आईकडे ताबा घेण्याचे आदेश दिला आहे; परंतु हा मुख्य नियम नाही. सर्व गोष्टी मुलाच्या कल्याणावर अवलंबून असतात आणि म्हणून तुम्हाला हे सिद्ध करणे आवश्यक आहे की, मुलाची आईच्या साहाय्याने योग्य प्रकारे काळजी घेतली जाईल. मात्र बराच वेळ गेला तर न्यायालयात सिद्ध करणे अवघड होईल. त्यामुळे ताबडतोब मुलांच्या ताब्यासाठी अर्ज दाखल करण्याचा सल्ला दिला जातो.
प्रश्न : आम्ही दोघे पती-पत्नी ७० वर्षांचे असून आमचा मुलगा मोठ्या कंपनीमध्ये नोकरी करतो; परंतु आम्हाला पाहात नाही, औषधांना पैसे पुरत नाहीत. सून देखील मोठ्या कंपनीत आहे. आम्ही काय केले पाहिजे?
उत्तर : तुम्ही ज्येष्ठ नागरिक कायद्यांतर्गत दावा दाखल करू शकता. मुलांनी आई-वडिलांना सांभाळणे हे मुलांचे कर्तव्य आहे, यासाठी तुम्ही कलम १२५ फौजदारी प्रक्रिया कायद्यांतर्गत पोटगीसाठी दावा दाखल करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला मुलाकडून अन्न-वस्त्र-निवारा त्याचप्रमाणे औषधोपचारासाठी खर्च दिला जातो.
प्रश्न : माझे वय ७० वर्षे आहे. मला एक मुलगी आहे, मी तिच्याकडेच राहते. मुलगा सांभाळत नाही. मी व माझ्या पतींच्या कमाईने आम्ही घर घेतले होते. माझे पती गेल्यानंतर मुलांनी मला घरातून बाहेर काढले. मला माझ्या नातवंडांना देखील भेटू दिले जात नाही. मला मुलाला माझे घर द्यायचे नाही. पण आता भांडणही नको आहे. माझी सर्व मालमत्ता मला मुलीलाच द्यायची आहे.
उत्तर : तुम्ही मृत्युपत्र करू शकता, ज्यानुसार आपण सर्व मालमत्ता मुलीला देऊ शकता. मृत्युपत्र हे तुमच्या मृत्यूनंतरच अमलात येते. जेणे करून आता घरात भांडण होणार नाहीत. तुमची मालमत्ता कशी घेतली गेली, हे मृत्युपत्रामध्ये व्यवस्थित लिहिणे गरजेचे आहे. मृत्युपत्रामधील प्रत्येक शब्द हा विचारपूर्वक लिहिणे गरजेचे असते. एक शब्द जरी चुकला आणि अर्थ समजण्यात कठीणाई झाल्यास मृत्युपत्र रद्द होऊ शकते. मृत्युपत्र ज्या दिवशी करणार आहात, त्यादिवशीचे तुम्ही मानसिकदृष्ट्या स्थिर आहात, असे एमबीबीएस डॉक्टरांचे प्रमाणपत्र घ्या. तुमच्यापेक्षा वयाने लहान असलेले दोन साक्षीदार घ्या. मृत्युपत्र हे कायम रजिस्टरच असावे, नोटरी केलेले नसावे. रजिस्टर मृत्युपत्र हा सबळ पुरावा आहे. मृत्युपत्र हे प्रत्येक व्यक्तीने केलेच पाहिजे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

