पुस्तकांमुळे मानवी जीवन समृद्ध : किशोर कदम

पुस्तकांमुळे मानवी जीवन समृद्ध : किशोर कदम

Published on

पुणे, ता. १० : ‘‘पुस्तके मानवी जीवन समृद्ध करतात. वाचनाची आवड निर्माण करणारे साहित्य खिळवून ठेवते. मानवी व समाज जीवनाचे विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न लेखक करत असतो. साहित्याचा वेध घेणारी पुस्तके निर्माण होणे ही काळाची गरज आहे,’’ असे मत कवी व अभिनेते किशोर कदम (सौमित्र) यांनी शनिवारी (ता. १०) व्यक्त केले.
अभिषेक धनगर अनुवादित आणि कृष्णा पब्लिकेशन्सच्या वतीने प्रकाशित ‘द हाऊस ऑफ पेपर’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. ‘पुस्तकांवरील पुस्तकं’ या विषयावर मनमोकळ्या गप्पा रंगल्या होत्या. याप्रसंगी लेखक नितीन रिंढे, कवी व समीक्षक गणेश विसपुते, लेखक प्रवीण बांदेकर, अनुवादक करुणा गोखले, यशवंतराव चव्हाण सेंटरचे मानद व्यवस्थापक दत्ता बाळसराफ, लेखक व संपादक अभिषेक धनगर, प्रकाशक चेतन कोळी, अनिल पवार आदी उपस्थित होते.
कदम पुढे म्हणाले, ‘‘चांगल्या पुस्तकांचा शोध घेणे, संग्रह करणे आणि त्याचे वाचन करणे आयुष्याला घडवत असते. काव्य आपल्याला भावना व्यक्त करण्याचे व्यासपीठ देते. साहित्य हवेहवेसे आणि आनंददायी असावे. पुस्तकांच्या सानिध्यात राहिले, तरी आपल्या आयुष्यात ऊर्जा निर्माण होत राहते.’’
रिंढे म्हणाले की, पुस्तकांवर लिखाण करणे ही एक कला आहे. पुस्तके वाचली जातात की नाही, याची चिंता करण्यापेक्षा पुस्तकांच्या गर्दीत जगणे अतिशय सुंदर असते. पुस्तकांना केंद्रबिंदू मानून मराठीत पुस्तकांवरील पुस्तक येण्याची गरज आहे.
विसपुते म्हणाले, ‘‘वास्तवाच्या जवळ जाणारी पुस्तके मनाला भिडतात. या पुस्तकात अनेक वास्तविक प्रसंग असून ते आपल्याला अचंबित करतात. पुस्तकांचा संग्रह करण्याचे वेड असावे. जगभरातील अनेक चांगली पुस्तके शोधून त्याचा विविध भाषांत अनुवाद झाला, तर सर्व भाषिकांना समृद्ध साहित्य वाचण्याची संधी मिळेल.’’
याप्रसंगी बांदेकर यांनी साहित्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम विशद केला. ‘‘वाचन माणसाला माणूस बनवते. जीवनाला एक नवी दिशा देते. विचार करायला शिकवते,’’ असे त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, गोखले, बाळसराफ व धनगर यांनीही मनोगत व्यक्त केले. चेतन कोळी यांनी प्रास्ताविक केले. मृदगंधा दीक्षित यांनी सूत्रसंचालन केले. अक्षय शिंपी यांनी पुस्तकातील निवडक उताऱ्यांचे अभिवाचन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com