उलगडले ‘मंगेशकरी’ नक्षत्रांचे सुरेल देणे
पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या सुमधुर स्वररचनांची रसिकांना पर्वणी

उलगडले ‘मंगेशकरी’ नक्षत्रांचे सुरेल देणे पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या सुमधुर स्वररचनांची रसिकांना पर्वणी

Published on

पुणे, ता. २३ : अनवट, अवघड पण तितक्याच ताकदीच्या अन् सुमधुर चालींची गाणी आणि सोबतीला या स्वररचनांच्या शिल्पकारानेच उलगडलेल्या अजरामर गीतांमागच्या कथा, अशा गारूड करणाऱ्या वातावरणात ‘भावगंधर्वां’ची संगीतयात्रा उलगडली. महाराष्ट्राला लाभलेल्या अनमोल अशा ‘मंगेशकरी’ नक्षत्राचे देणे, रसिकांनी शनिवारी अनुभवले.
निमित्त होते, सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित ‘नक्षत्रांचे देणे - पं. हृदयनाथ मंगेशकर’ या विशेष कार्यक्रमाचे. ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत क्षेत्रातील चौफेर कार्याचे दर्शन घडवत त्यांच्या या अवीट गोडीच्या रचनांचे सादरीकरण या कार्यक्रमात झाले. प्रसन्न पावसाळी वातावरणात आणि चोखंदळ रसिकांच्या ‘हाऊसफुल्ल’ गर्दीत हा कार्यक्रम सादर झाला.
या कार्यक्रमाची संकल्पना आणि सादरीकरण ‘इंडियन मॅजिक आय’ यांचे होते. ‘सेपियंट फिनसर्व्ह’ हे कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक होते, तर ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि.’ हे सहयोगी प्रायोजक होते. याप्रसंगी ‘सेपियंट फिनसर्व्ह’चे संस्थापक-संचालक अमित बिवलकर, ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.’चे संस्थापक-संचालक डॉ. किरण ठाकूर, विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला ‘देवा तुचि गणेशु’, संत मीराबाई यांचे भजन ‘पपीहा रे’, ‘अरे अरे ज्ञाना झालासी पावन’ ही गीते सादर झाली. कवी ग्रेस यांची ‘घर थकलेले संन्यासी’ आणि ‘ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता’ ही दोन अनवट चालीची गाणी सादर झाली. ग्रेस आणि हृदयनाथ मंगेशकर यांच्यातील एका पत्र संवादातून जन्माला आलेले गीत म्हणजे, ‘भय इथले संपत नाही’ ! ही निर्मिती कथा उलगडत हे गीत सादर झाले.
‘राजसा जवळी जरा बसा’ या सदाबहार लावणीला रसिकांची भरभरून दाद मिळाली. ‘जैत रे जैत’ या चित्रपटातील सगळीच गाणी अतिशय लोकप्रिय आहेत. त्यामुळे यातील ‘डोंगर काठाडी ठाकरवाडी’, ‘आम्ही ठाकर ठाकर’, ‘लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला’, ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’ आदी गाण्यांची गीतमालाच सादर झाली. सुरेश भट यांचे ‘तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे’ या गीताला ‘वन्स मोअर’ची दाद मिळाली. ‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या’, ‘मेंदीच्या पानावर’, ‘उषःकाल होता होता’ या अजरामर गाण्यांनी रसिकांनी अवीट श्रवणानंद दिला. उत्तरार्धात देखील ‘गगन सदन’, ‘असा बेभान हा वारा’, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’, ‘हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा’, ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘दयाघना’ अशी अनेक लोकप्रिय गाणी सादर झाली.
ज्येष्ठ गायक रवींद्र साठे यांच्यासह अजित परब, विभावरी आपटे, मधुरा दातार, मनीषा निश्चल, सचिन इंगळे यांनी सर्व गाणी सादर केली. या कार्यक्रमाचे लेखन-दिग्दर्शन श्रीरंग गोडबोले यांचे होते. त्यांनीच हृदयनाथ मंगेशकर यांच्याशी संवाद साधला. संगीत संयोजन सचिन इंगळे यांनी केले. यश वैद्य यांनी सूत्रसंचालन केले.
----
पंडितजींच्या सादरीकरणाने वाढली खुमारी
‘नक्षत्रांचे देणे’ हा साहित्य, संगीत आणि चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्यक्तींच्या कार्याचा धांडोळा घेणारा आणि त्यांचा जीवनपट रंजक पद्धतीने उलगडून दाखवणारा कार्यक्रम आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी अशा अनेकविध दिग्गज व्यक्तींवर आधारित सादर झालेल्या कार्यक्रमात पं. हृदयनाथ मंगेशकर सहभागी झाले होते. आता त्यांच्याच संगीतयात्रेचा प्रवास या कार्यक्रमातून उलगडला. यावेळी दस्तुरखुद्द हृदयनाथ मंगेशकर हे देखील कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांच्याकडूनच या गीतांमागील प्रेरणा अन् निर्मितीच्या कथा ऐकायला मिळाल्याने कार्यक्रमाची खुमारी अधिकच वाढली. मराठी रसिकांचे भावविश्व समृद्ध करणाऱ्या या ‘नक्षत्राला’ रसिकांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात सलाम केला.
फोटो ः 15907

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com