ना अश्रूंशी देणे-घेणे...ना भुकेलेल्या पोटाशी!
पुणे, ता. २४ : छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील दत्त मंदिरासमोरील रस्त्याच्या कडेला एक मुलगा तोरण विक्री करत असताना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथक दाखल झाले. त्यातील ३ ते ४ कर्मचाऱ्यांनी मुलाच्या हातातील वस्तू हिसकावून घेतल्या, त्यानंतर संबंधित मुलास मारहाण करत त्याच्यावर कारवाई केली. या प्रकारामुळे घाबरलेला मुलगा रडत, गयावया करत कर्मचाऱ्यांना त्यास सोडण्यासाठी याचना करत होता, मात्र रडणाऱ्या मुलास ओढत घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना ना त्याच्या अश्रूंशी देणे-घेणे होते... नाही त्याच्या भुकेलेल्या पोटाशी!
गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने नागरिकांकडून खरेदीसाठी मध्यवर्ती भागात रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आली होती. उत्सवासाठी लागणारे साहित्य दुकानांसह रस्त्याच्या कडेला उभे राहणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांकडूनही खरेदी करतात. सायंकाळी पाच वाजण्याचा सुमारास दत्त मंदिरासमोर थांबलेल्या एका विक्रेत्याकडून ग्राहक तोरण खरेदी करत होते. त्याच वेळी महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील पथक तेथे दाखल झाले. पथकातील कर्मचाऱ्यांनी तोरण विक्री करणाऱ्या मुलाकडील साहित्य हिसकावून घेतले. मुलास मारहाण करत त्यास अक्षरशः ओढत नेले. कायदा हातात घेऊन विक्रेत्यास मारहाण करण्याचा हा मुजोरपणा येतो कुठून, असा प्रश्न प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी उपस्थित केला.
विक्रेत्याकडून तोरण खरेदी करणाऱ्या ग्राहकाकडून पैसेही त्यास घेऊन दिले नाहीत. सणासुदीचे दिवस असल्याने दिवसभर रस्त्यावर उभे राहून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी राबणाऱ्या मुलास कर्मचारी ओढत घेऊन जाताना रस्त्यावरील नागरिकही हळहळले. दरम्यान, काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी विक्रेत्याबाबत घडलेला हा प्रकार ‘सकाळ’च्या प्रतिनिधीसमोर मांडला.
----------------
कारवाई करा, पण मारहाण कशासाठी ?
सणासुदीचे दिवस असल्याने अनेक जण विविध प्रकारच्या वस्तू विक्री करण्यासाठी वाहतुकीला अडथळा ठरू नये, यादृष्टीने रस्त्याच्या कडेला थांबतात. रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर महापालिका प्रशासनाकडून कारवाई केली जाते. त्या वेळी अतिक्रमण करणाऱ्यांकडून अनेकदा कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचे प्रकार घडतात. मात्र, संबंधित घटनेत कर्मचाऱ्यांनी विक्रेत्या मुलास मारहाण करत ओढत नेले. मुळात, संबंधित विक्रेत्याच्या वस्तू जप्त करणे, त्याने पथकास विरोध केला असल्यास त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई होणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र विक्रेत्यास मारहाण करून ओढत नेल्याचा प्रकार घडला.
-------
विक्रेत्या मुलास महापालिका कर्मचाऱ्यांनी मारहाण करत ओढत नेले. कर्मचाऱ्यांसमोर गयावया करणाऱ्या त्या मुलास त्याच्या वस्तूचे पैसेही देऊ दिले नाहीत. सणासुदीच्या काळात गरिबांचे पोट मारण्याचा प्रकार महापालिकेने करू नये. - नीलेश गोडंबे, प्रत्यक्षदर्शी
----
सणासुदीच्या काळातच विक्रेत्यांना दोन पैसे मिळतात, असे असताना त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्या उदरनिर्वाहावर पाय आणला जातो. याउलट रस्त्यांवर थेट दुकाने थाटणाऱ्या, रस्त्यामध्ये रिक्षा, अन्य वाहने लावून रस्ते अडविणाऱ्या, वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्यांवर महापालिका, पोलिस कारवाई करत नाहीत. फक्त हातावर पोट असणाऱ्यांवर कारवाई कशासाठी?- ॲड. प्रताप परदेशी
-----
विक्रेत्याने महापालिका कर्मचाऱ्यांसमवेत वाद घातले असावेत. त्यामुळे महापालिका पथकाने कारवाई केली आहे. याबाबत अधिक माहिती घेतली जाईल.
-संदीप खलाटे, प्रमुख अतिक्रमण विभाग, पुणे महापालिका
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.