सुफी मंडळींचा उद्देश धर्मांतराचाच डॉ. गो. बं. देगलूरकर यांचे मत ः अंजली मालकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
पुणे, ता. १० : ‘‘सुफी मंडळी धर्म परिवर्तनासाठीच भारतात आली होती. सुफी संतांनी भारतात मुस्लिम धर्म वाढवण्याचे काम केले, म्हणूनच भारतात आल्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान, अध्यक्ष हे आवर्जून अजमेरच्या दर्ग्याला जायचे. सुफी संगीत गाणाऱ्या व्यक्तींनी ही पार्श्वभूमी लक्षात ठेवली पाहिजे,’’ असे मत मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले. ‘महाराष्ट्राला संस्कृती देण्याचे काम मराठवाड्याने केले’, असेही ते म्हणाले.
गायिका व संगीततज्ज्ञ अंजली मालकर लिखित आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रकाशित ‘हिंदुस्थानी अभिजात संगीताचा इतिहास’ या ग्रंथाच्या पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा दोन्ही खंडांचे प्रकाशन डॉ. देगलूरकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ गायक डॉ. विकास कशाळकर, लेखिका अंजली मालकर आदी उपस्थित होते.
डॉ. देगलूरकर म्हणाले, ‘‘सातवाहन राजांपासून यादवांपर्यंत सर्वांची राजधानी महाराष्ट्रात होती. यादवांच्या काळात तर महाराष्ट्रात संस्कृतीला मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. त्यांच्या दरबारात गायक, वादक, नाटककार, साहित्यिक, भविष्यवेत्ते होते. त्यामुळे महाराष्ट्राला संस्कृती देण्याचे काम मराठवाड्याने केले.’’
‘‘अभिजात संगीताच्या इतिहासाचा परिपूर्ण दस्तावेज आपल्याकडे नव्हता. ती उणीव मालकर यांच्या पुस्तकाने भरून काढली आहे. पूर्वीच्या काळातील लेखनात आख्यायिका बऱ्याच होत्या. पण मालकर यांचे लेखन हा विश्वासार्ह इतिहास असल्यामुळे हा ग्रंथ संगीताच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे,’’ असे गौरवोद्गार डॉ. मोरे यांनी काढले.
डॉ. कशाळकर म्हणाले, ‘‘आजवर संगीताचा विश्वासार्ह इतिहास उपलब्ध नव्हता. काही पुस्तकांमध्ये गोष्टीच अधिक होत्या. अंजली मालकर यांनी मात्र सातशे वर्षांचा संगीताचा इतिहास तपशीलवार शब्दबद्ध केला आहे. हे खरेतर २०-२५ माणसांनी एकत्र येऊन करायचे काम होते. पण मालकर यांनी ते एकट्याने पेलवले, हे कौतुकास्पद आहे.’’
मालकर यांनी पुस्तकामागील भूमिका विशद केली. स्वरदा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. यमाजी मालकर यांनी आभार मानले.
----
अस्सल संगीतासमोर ‘एआय’चे आव्हान
यापुढील काळात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने तयार होणाऱ्या संगीतात अस्सल आणि बनावटीचा फरक ओळखणे कठीण जाणार आहे. येणारी पिढी बनावट संगीताला अस्सल मानण्याचा धोका आहे. त्यामुळे ‘एआय’ला चकवा देण्यासाठी काय करता येईल, याचा विचार करावा लागेल, अशी गरज डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केली.
फोटो ः ५९१२२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.