राममंदिर झाले; आता राष्ट्रमंदिराची उभारणी डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन; आदित्य प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कृतज्ञता सोहळा
पुणे, ता. १ : ‘‘अयोध्येत श्रीराम मंदिर उभे राहिले आहे. आता राष्ट्रमंदिराची उभारणी करायची असून ते पूर्वीपेक्षा अधिक भव्य आणि सुंदर करायचे आहे,’’ असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सोमवारी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त आदित्य प्रतिष्ठानतर्फे आयोजित कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी कांचीकामकोटि पिठाचे जगद्गुरू शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती स्वामी, आदित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. शंकर अभ्यंकर, अपर्णा अभ्यंकर आदी उपस्थित होते.
डॉ. भागवत म्हणाले, ‘‘संघाचे काम हे देशाचेच काम आहे. संपूर्ण समाज संघटित झाला पाहिजे, हे संघाचे उद्दिष्ट आहे. कारण समाज संघटित झाला तर राष्ट्र वैभवसंपन्न, बलसंपन्न होईल आणि भारत बलसंपन्न होईल तेव्हा विश्वाला सुखशांती लाभेल. भारताच्या कल्याणातून विश्वाचे कल्याण साधते. देशातील सर्व जनता एकत्रित उभी राहते, तेव्हा देशाचे भाग्य बदलते. त्यासाठी समाजाला तयार करणे, हे कार्य संघ करत आहे. संघाच्या स्वयंसेवकांनी अक्षरशः रक्ताचे पाणी करून आणि कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता या कार्यात झोकून दिले आहे. भक्तीचा भाव मनात ठेवून शक्तीचे कार्य करत असल्याने संघशक्तीचा कधीही उपद्रव होत नाही.’’
डॉ. अभ्यंकर म्हणाले, ‘‘जगातील कित्येक संस्कृती परकीय आक्रमणांखाली मोडून पडल्या, पण टिकून राहिली ती केवळ भारतीय संस्कृती. हा मी जगातील आठवा चमत्कार मानतो. या आक्रमणांमध्ये काहींनी बाह्यांगावर आक्रमण केले तर काहींनी अंतरंगावर आक्रमण केले. विशेषतः इंग्रजांनी आपल्याला ‘स्व’ची ओळख विसरायला लावली. ती ओळख पुन्हा प्रस्थापित करण्याचे, हिंदूंना संघटित करण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अविरतपणे करत आहे. याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा हा सोहळा आहे.’’
यावेळी आदित्य प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कृतज्ञतापत्र प्रदान करण्यात आले. डॉ. भागवत यांच्या हस्ते आदित्य प्रतिष्ठानतर्फे उभारण्यात येणाऱ्या ‘वैश्विक संतभारती’ या प्रकल्पाच्या कोनशिलेचे आभासी पद्धतीने अनावरण झाले. तसेच, डॉ. शंकर अभ्यंकर लिखित ‘भारतीय उपासना’ या ग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन झाले. आदित्य अभ्यंकर यांनी सूत्रसंचालन केले.
----
शक्ती असल्याशिवाय समाज ऐकत नाहीत. त्यामुळेच आता जगात भारताच्या पंतप्रधानांचे ऐकले जाते. शक्तीच्या आधाराने सत्य सांगता येते. एकतेतून विविधता निर्माण झाली, हा भारतीय विचारांचा प्रारंभबिंदू आहे. मिळून चालायचे आहे तर धर्म आवश्यक आहे. सामूहिक जीवनाची धारणा जो करतो, तो धर्म आहे. धर्माची आवश्यकता जगाला आज लक्षात येत असली तरी आपल्या पूर्वजांना ती आधीच लक्षात आली होती.
-डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
----
हिंदूराष्ट्र ही सर्वांना एकत्र आणणारी संकल्पना
हिंदू धर्म हाच सर्वांचा सत्कार, सन्मान करणारा आहे. हिंदूराष्ट्र ही कोणाच्या विरोधातील नाही; तर सर्वांना एकत्र आणणारी संकल्पना आहे. सनातन धर्मात लोकशाहीचा भाव असून लोकशाहीत चांगल्या लोकांना बळ मिळायला पाहिजे. संघाने अशा लोकांना बळ द्यावे. आज देश प्रगती करत असून, पुढील प्रगतीसाठी सर्वांनी आपले भेद बाजूला ठेवून एकत्र यायला हवे,’’ अशी अपेक्षा जगद्गुरू शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती स्वामी यांनी व्यक्त केली. ‘कला, विज्ञान, संस्कृती यांची राजधानी पुणे असून, सेवेची राजधानी नागपूर आहे’, असेही ते म्हणाले.
फोटोः 16792
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

