कोंडीमुक्तीसाठी ‘पीएमआरडीए’ समन्वयक
हिंजवडी आणि चाकणबाबत विभागीय आयुक्तांचा निर्णय; ‘सिंगल पॉइंट कोऑर्डिनेटर’ नियुक्ती

कोंडीमुक्तीसाठी ‘पीएमआरडीए’ समन्वयक हिंजवडी आणि चाकणबाबत विभागीय आयुक्तांचा निर्णय; ‘सिंगल पॉइंट कोऑर्डिनेटर’ नियुक्ती

Published on

पिंपरी, ता. ३१ : हिंजवडी आयटी पार्क आणि चाकण- तळेगाव- म्हाळुंगे औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी कमी करणे आणि पायाभूत सुविधा मजबूत करण्यासंदर्भात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) ‘सिंगल पॉइंट कोऑर्डिनेटर’ म्हणून नियुक्ती करण्याचा आदेश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी गुरुवारी दिला. स्थानिक स्वराज्य संस्था आणि सर्व आस्थापनांमध्ये एकात्मिक समन्वयाच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर, हिंजवडी व चाकण संदर्भातील विभागीय आयुक्तांनी पंधरा दिवसांत दुसरी बैठक घेतली. पुणे व पिंपरी-चिंचवड आणि आयटी, औद्योगिक व निवासी कॉरिडॉरमधील वाहतूक कोंडी आणि इतर प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या उद्देशाने बैठक झाली. औद्योगिक संस्था प्रतिनिधी, संघटना आणि पिंपरी-चिंचवडमधील गृहनिर्माण सोसायटी प्रतिनिधी आणि अनलॉक हिंजवडी आयटी पार्कचे प्रतिनिधींसह जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त पोलिस आयुक्त (वाहतूक) पुणे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, पोलिस उपायुक्त (वाहतूक) पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ, एमआयडीसी, तळेगाव, चाकण, आळंदी नगर परिषद व देहू नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी प्रस्तावित उपाययोजना सादर केल्या.
दरम्यान, या प्रश्‍नी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बुधवारी बैठक झाली होती. त्यानंतर आता विभागीय आयुक्तांनी गुरुवारी काही निर्णय घेतले आहेत.

बैठकीतील प्रमुख निर्णय आणि आदेश
- एकात्मिक समन्वयासाठी पीएमआरडीए जबाबदार असेल
- भूसंपादनासाठी निधीसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणे
- नाशिक फाटा ते चाकण दरम्यान आठपदरी महामार्गाचे काम गतिमान करणे
- तळेगाव-चाकण-शिरूर मार्गासाठी ३० मीटर रुंदीचा ५४८ विकास आराखडा (डीपी) रस्ता
- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून अतिरिक्त रुंदीकरणाचा प्रस्ताव
- २०५ स्थानिक भूधारकांसाठी तत्काळ भूसंपादन आणि नुकसान भरपाई
- चाकण आंबेठाण चौकातील पोल स्थलांतरण ३० दिवसांच्या आत पूर्ण करणे
- तळेगाव-चाकण-शिरूर रस्ता चारपदरी प्रस्ताव, भूसंपादन कामाला गती देणे
- आठ दिवसांच्या आत खड्डे भरणे व मोई ते निगोजे ४५ मीटर रुंद रस्त्याचे काम सुरू होईल
- मोई ते चिखली रस्त्यावरील रुंदीकरण आणि पूल बांधकामाचे काम सुरू करणे
- मोशी चौक, आळंदी चौक, गणेश साम्राज्य चौक, आळंदी फाटा चौक, स्पाईसर चौक, येळवाडी चौक रुंदीकरण
- बहुळ आणि भंडारा टेकड्यांच्या पायथ्याशी असलेली गायरान जमीन ट्रक टर्मिनलसाठी हस्तांतरित करणे
- चाकण आणि हिंजवडीसाठी स्वतंत्र समन्वय समित्या स्थापन करणे.
- पीएमआरडीएने चऱ्होली पूल ते आळंदी रोड (आळंदी नगरपालिकेच्या हद्दीबाहेर) जोडणारा १८ मीटर रुंद, दोन किलोमीटर बायपास रस्ता आणि इंद्रायणी नदीवर १२ मीटर रुंद पूल विकसित करणे
- वाहतूक सुरळीत करण्यासाठी हिंजवडीतील अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे प्राधान्याने बुजवणे

‘‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप महायुती सरकारच्या माध्यमातून हिंजवडी आयटी पार्क, चाकण औद्योगिक क्षेत्र आणि पुणे-पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागाची ‘कनेटिव्हीटी’ वाढवण्याच्या दृष्टीने प्रशासनाने ‘ॲक्शन प्लॅन’ तयार केला आहे. त्यामुळे आगामी काळात वाहतूक कोंडी आणि समस्यामुक्त पुणे-पिंपरी-चिंचवड परिसर या संकल्पना निश्चितपणे
यशस्वी होईल, असा विश्वास वाटतो.
- महेश लांडगे, आमदार, भोसरी
....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com