

पिंपळे गुरव, ता. ९ : जुनी सांगवी परिसरातील संगमनगर, पवनानगर आणि बुद्धघोष हाउसिंग सोसायटीमध्ये चिखलमिश्रित पाणीपुरवठा होत आहे. शनिवारी (ता. ९) सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. यामुळे आजार पसरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली.
या परिसरात दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शनिवारी सायंकाळी सुमारे साडेपाच वाजता पाणीपुरवठा सुरू झाला; मात्र नळातून येणारे पाणी माती, गाळ आणि इतर अशुद्ध घटकांनी युक्त होते. हे पाणी पिण्यास अयोग्य तर आहेच, पण दैनंदिन वापरासाठीही धोकादायक असल्याचे नागरिकांनी सांगितले.
नागरिकांच्या मते, ‘‘पाणीपुरवठा यंत्रणेतील अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करत नसल्याने संपूर्ण व्यवस्था ठेकेदाराच्या हवाली करण्यात आली आहे. परिणामी, अशा समस्या वारंवार निर्माण होत आहेत. गढूळ आणि दूषित पाणीपुरवठा होत असतानाही संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याने आमच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला. स्वयंपाक, घरगुती वापर आणि पिण्याच्या पाण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेकांना पिण्यासाठी बाटलीबंद पाणी खरेदी करावे लागत असून त्यामुळे आर्थिक भारही वाढला आहे. ‘‘पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनची सखोल तपासणी करून गळती, गंज किंवा तांत्रिक बिघाड त्वरित दुरुस्त करावेत, तसेच नियमित आणि स्वच्छ पाणीपुरवठा करावा,’’ अशी मागणी होत आहे.
जुनी सांगवी येथील पाण्याच्या टाक्यांची साफसफाई करण्यात आली असून टाकीत साचलेला गाळ पूर्णपणे काढला आहे. ही टाकी जुनी बांधकामाची असल्यामुळे त्यामध्ये ओव्हरफ्लो, इनलेट आणि आउटलेट अशीच व्यवस्था आहे. साफसफाईनंतर पाणीपुरवठा सुरळीत होऊन स्वच्छ पाणी येण्यास सुरू होईल.
- साकेत पावरा, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग
दोन दिवस पाण्याची वाट पाहिल्यानंतरही नळातून गढूळ आणि दूषित पाणी येत आहे. हे पाणी पिण्यास तर अयोग्य आहेच, पण घरगुती वापरासाठीही धोकादायक ठरत आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची विशेष चिंता वाटते.
- भारती खरात, गृहिणी
PNE26W17992
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.