
‘टिडीआर’ला परवानगीची मनसेची आयुक्तांकडे मागणी
पुणे, ता. २४ ः शहरातील सहा मीटर रुंदीच्या रस्त्यांवरील इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी तेथे हस्तांतरणीय विकास हक्क (टिडीआर) वापरण्याची तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मंगळवारी केली.
पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेचे अध्यक्ष हेमंत संभूस यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात जुन्या इमारती, जुने वाडे हे पुनर्विकासाच्या प्रतिक्षेत आहेत. परंतु केवळ राज्य सरकारच्या अनास्थेमुळे त्यांचा पुनर्विकास रखडला आहे. त्यामुळे शहरातील लाखो नागरिक हवालदिल झाले आहेत. शहराच्या मूलभूत सोयी-सुविधा सक्षम करावयाच्या असतील तर जुन्या इमारतींचे व वाड्यांचे पुनर्विकासाचे धोरण तत्काळ राबवून शहरातील लाखो नागरिकांना राज्य सरकारने व महानगरपालिकेने दिलासा देणे गरजेचे आहे व त्यासाठी महापालिका आयुक्तांनी नगर विकास खात्याकडे यासाठी पाठपुरावा करून सहा मीटर रस्त्यांवरील पुनर्विकास बांधकामांना टीडीआर वापरता येईल, अशी घोषणा करणे आवश्यक आहे. मेट्रो कॉरीडॉरमध्ये महामेट्रोकडून तर जादा चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मंजूर झाला पण त्याचा प्रिमियम अतिशय महागडा आहे. तसेच क्लस्टर डेव्हलपमेंटच्या तरतुदींमध्येही क्लिस्टता आहे. त्यामुळे सहा मीटर रस्त्यावर टीडीआर वापरण्याचा निर्णय घ्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.
-------------