‘महाज्योती’च्या टॅबवाटपला मुहूर्त! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘महाज्योती’च्या
टॅबवाटपला मुहूर्त!
‘महाज्योती’च्या टॅबवाटपला मुहूर्त!

‘महाज्योती’च्या टॅबवाटपला मुहूर्त!

sakal_logo
By

पुणे, ता. २५ ः महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (महाज्योती) जेईई, नीट स्पर्धा परीक्षेसाठी गरजू विद्यार्थ्यांना मोफत टॅब वाटप करण्यात येणार होते. मात्र, गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांना त्याची प्रतिक्षा होती. टॅबअभावी गरीब विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी अडचणी येत होत्या. अखेर येत्या चार फेब्रुवारीनंतर नोंदणीकृत विद्यार्थ्यांना टॅब वाटण्यात येणार असल्‍याची माहिती ‘महाज्योती’तर्फे देण्यात आली आहे.
दरम्‍यान विधानपरिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदार संघाकरिता निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने चार फेब्रुवारीनंतर हे वाटप केले जाईल. राज्यातील समाज कल्याण विभागाचे ३६ जिल्हा सहाय्यक उपायुक्त अधिकारी टॅब वाटप करणार आहेत, असे महाज्येतीतर्फे सांगण्यात आले.

विलंब का झाला?
- विद्यार्थ्यांची संख्या पाहता संस्थेला सुमारे १३५०० टॅबची गरज होती
- आधी पाच हजार टॅबची मागणी आली होती
- नंतर पुन्हा साडेआठ हजार टॅबची मागणी झाली
- त्यावेळी संस्थेकडे टॅब उपलब्ध नव्हते
- त्यात गेल्या दहा-बारा दिवसांमध्ये हे टॅब मिळाले
- त्यात सीमकार्ड, ॲप अशा सर्व गोष्टी टाकण्यासाठी काही वेळ लागतो
- त्यामुळे टॅब वाटण्यास विलंब झाला

उपोषणाच्या इशाऱ्यानंतर पत्र
- गरीब व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जेईई, नीट, एमएचटी-सीईटीचे प्रशिक्षण घेण्यासाठी आर्थिक अडचणी येतात
- महाज्योतीतर्फे अशा विद्यार्थ्यांना १८ महिन्‍यांचे मोफत ऑनलाइन प्रशिक्षण सुरू करण्यात आले
- यासाठी त्यांना मोफत टॅब ही दिले जातात
- ज्यामध्ये असलेल्या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करता येते
- गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून विद्यार्थ्यांना टॅब उपलब्ध करण्यात आलेले नाहीत
- त्यात आचारसंहितेचे कारण सांगत अद्याप तेच होत आहे
- त्यामुळे बेमुदत उपोषणाचे पत्र पाठविल्यानंतर त्याची दखल घेण्यात आली
- विद्यार्थ्यांना टॅब वाटण्यात येणार असल्याचे पत्र महाज्‍योतीने नुकतेच पाठविले आहे, अशी माहिती संस्थेचे माजी संचालक प्रा. दिवाकर गमे यांनी सांगितले.

आता लवकरात लवकर हे टॅब वाटण्यात येणार असून पुणे विभागाला टॅब पुरविण्यात आले आहेत. आचारसंहिता संपताच त्यांचे वाटप केले जाईल.
- राजेश खवले, व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती

२० नोव्हेंबर २०२१ मध्ये महाज्योती अंतर्गत ऑनलाइन प्रशिक्षणाकरिता नोंदणी केली होती. तसेच गेल्या वर्षी मार्चमध्ये सांगण्यात आले की टॅब लवकरच उपलब्ध केले जातील. मात्र अद्याप मला टॅब मिळाला नसून बारावीची परीक्षा तोंडावर आली आहे. ‘जेईई’साठी तयारी करायची आहे, त्‍यात मोबाईल ही वेळेवर मिळत नसल्याने ऑनलाइन प्रशिक्षणाचेच बारा वाजले आहेत. सध्या जमेल तसे अभ्यास करत असून लवकरात लवकर टॅब उपलब्ध झाला तर पुढील चार महिन्यात ही तयारी करू.
- प्राची सांगोले (नाव बदलले आहे), विद्यार्थिनी-यवतमाळ

सहाय्यक आयुक्तांवर जबाबदारी
महाज्योतीच्या वतीने प्रजासत्ताक दिनादिवशी जेईई, नीट, एमएचटी-सीईटीचे प्रशिक्षण घेणाऱ्या नोंदणीकृत विद्यार्थ्यांना मोफत टॅब वाटण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालय (कौन्सिल हॉल) पुणे येथे हे टॅब उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वाटण्यात येणार आहेत. दरम्यान, टॅब वाटपाची कार्यवाही सहाय्यक आयुक्‍त समाज कल्याण, पुणे यांना सोपवण्यात आली आहे.