Sun, Jan 29, 2023

‘नाती वांझ होताना’चे प्रकाशन
‘नाती वांझ होताना’चे प्रकाशन
Published on : 25 January 2023, 9:39 am
पुणे, ता. २५ : ‘‘नात्यातील ओलावा कमी झाला की, नाती वांझ होतात आणि समाजातील दुरावा वाढत जातो. त्यातून विसंवाद, फसवणूक, क्रूरता जन्माला येते. अशा वेळी चांगुलपणाची बेरीज समाजाला एकसंध ठेवण्यासाठी गरजेची असते. नात्यांमधील वीण घट्ट करत ती फुलवण्याचा प्रयत्न आपण करायला हवा’’, असे मत ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
संस्कृती प्रकाशनातर्फे मनीषा पाटील-हरोलीकर यांच्या ‘नाती वांझ होताना’ कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात डॉ. सबनीस बोलत होते. या कार्यक्रमात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह कवी उद्धव कानडे, कवी प्रा. प्रदीप पाटील, डोंगरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष वसंत पाटील, प्रकाशिका सुनीताराजे पवार, कवयित्री मनीषा पाटील-हरोलीकर, पृथ्वीराज पाटील, सर्जेराव पाटील, मनीषा रायजादे आदी उपस्थित होते.